मोगरा कोमेजला! भाव मिळत नसल्याने शेतकरी रडकुंडीला, मागणीत घट

Jasmine Farming
Jasmine Farming

विक्रमगड : विक्रमगड तालुक्‍यातील मोगरा शेतकऱ्यांना मालाला भाव मिळत नसल्याने नुकसान होत आहे. तालुक्‍यातून रोज अंदाजे 12-13 टन मोगऱ्याच्या कळ्या दादर, कल्याण, सुरत, नाशिक, पालघर मार्केटमध्ये निर्यात होतात. मोगऱ्याच्या शेतीमुळे वर्षाकाठी लाखो रुपयांची उलाढाल होत असते; मात्र कोरोनाच्या संसर्गाने तसेच सहा महिने लॉकडाऊन असल्याने विक्रमगड तालुक्‍यातील मोगरा उत्पादक शेतकऱ्यांचे हाल झाले आहेत. 

खांड, वाकडूपाडा, ओंदे, साखरा, सुकसाले, कुरंझे, उघाणी, उपराले, देहर्जा, उंबरवांगण, साखरे, पोचाडा, वाकी, कावळा अशा अनेक गावांत शेकडो आदिवासी व शेतकरी मोगऱ्याचे उत्पादन घेतात. मोगऱ्याचे दररोज साधारण पाच ते 15 किलो उत्पन्न अनेकांना मिळते. ज्यात प्रतिकिलो 300 ते 500 रुपये इतका दर मिळत असतो; मात्र कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन लागू झाल्याने अनेक कार्यक्रम बंद असल्याने उत्पादकांना गिऱ्हाईक मिळेनासे झाले आहे. त्यामुळे मोगऱ्याचे भाव 60 रुपये किलो झाले आहेत. मजुरांना 40 रुपये किलो कळ्या खुडण्यासाठी द्यावे लागत असल्याने, मजुरीएवढाच भाव मालाला मिळत आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून मंदिरे, बाजारपेठा, लग्नसराई लॉकडाऊनमध्ये सापडल्याने फुलशेतीवर कुऱ्हाड कोसळली. मोगरा उत्पादक रातोरात बेरोजगार झाला असून ऐन सराईत मोगऱ्याची मागणी ठप्प झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पावसाळा सुरू झाल्यानंतर गिऱ्हाईकच नसल्याने त्याचा फटका मोगरा उत्पादकांना बसला आहे. त्यामुळे या वर्षीचा हंगाम वाया गेला असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडाले. 

नवरात्र, दिवाळीत भाव मिळण्याची आशा- 
लॉकडाऊन आणि पावसाच्या संततधारेमुळे फुलांचे भाव कोसळले. त्यामुळे उत्पादक, विक्रेते, व्यावसायिक हवालदिल झाले आहेत; मात्र फुलांचे भाव नवरात्र व दिवाळी काळात वाढतील, अशी आशा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. 

या वर्षी कोरोना संसर्गामुळे मंदिरे, बाजारपेठा, लग्नसराई संचारबंदीत ऐन सराई निघून गेल्याने मोगरा विकता आला नाही. पावसाळ्यात मोगऱ्याला गिऱ्हाईक मिळत नसल्याने मोठे नुकसान झाले. आता व्यापारी केवळ 60 रुपये किलोने मोगऱ्याला भाव देत आहेत; तर मजुरांना कळ्या काढण्यासाठी आम्हाला 40 रुपये द्यावे लागत आहेत. त्यामुळे आमचे मोठे नुकसान होत आहे. 
- हरी तारवी, मोगरा उत्पादक शेतकरी, विक्रमगड 

सध्या मोगऱ्याला बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने उत्पादन खर्चही निघेनासा झाला आहे. त्यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागते आहे. आगामी नवरात्र व दिवाळीत तरी बाजारभावात वाढ होईल, या आशेवर मोगऱ्याची जोपासना करीत आहोत. 
- शिवम मेहता, मोगरा उत्पादक शेतकरी, विक्रमगड 

(संपादन : वैभव गाटे)

losses of vikramgad Mogra farmers due to less of rates

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com