
बहुचर्चित सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात एम्सच्या अहवालात सुशांतचा मृत्यूत कोणताही घातपात झाला नसल्याचे स्पष्ट झाले
मुंबईत : बहुचर्चित सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात एम्सच्या अहवालात सुशांतचा मृत्यूत कोणताही घातपात झाला नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र या प्रकरणात महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांची काही जणांनी जाणीवपूर्वक बदनामी केल्याचे आता पुढे आले आहे. याप्रकरणी सायबर पोलिसात दोन वेगवेगळे गुन्हे नोंदवण्यात आल्याचे माहीत पोलिस उपायुक्त (सायबर) रश्मी करंदीकर यांनी दिली आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांवर चौफेर टीका झाली होती. सोशल मीडियावरूनही अनेक गोष्टी रंगवून सांगितल्या जात होत्या. महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांच्या बदनामीचं मोठं षडयंत्र रचलं गेल्याचं आता पुढे आले आहे.
महत्त्वाची बातमी : सुशांतच्या मुंबईतील प्रॉपर्टीसाठी घरच्यांनीच त्यावर दबाव टाकला का ?
याप्रकरणात महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांच्या बदनामीसाठी तब्बल 80 हजार फेक अकाऊन्ट बनवण्यात आली असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. तर सोशल मिडियावर काही जणांनी मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकार विषयी चुकीची माहिती सादर केली. या सर्व घटनेमागे कोण आहेत. त्याचा आता पोलिस शोध घेत असल्याचं पोलिस आयुक्त परमबिर सिंह यांनी म्हटलं आहे.
पोलिसांना बदनाम करण्याचे सर्व प्रयत्न हाणून पाडू असा इशाराही त्यांनी दिला. सिंग म्हणाले, मुंबई पोलिसांची बदनामी करण्याचं षडयंत्र रचलं गेलं. या षडयंत्रामागे कोण आहेत याचा तपास केला जात आहे. मुंबई पोलिसांनी केलेला सर्व तपास सर्वोच्च न्यायालयाला सादर केला होता आणि ते समाधानी होते. सत्य हे कायम सत्यच असते ते सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. अनेक फेक अकाउंटस तयार केले गेले त्या माध्यमातून पोलिसांची बदनामी केली गेली. त्या सर्वबाबतीत तपास सुरू आहे अशी माहितीही त्यांनी दिली.
महत्त्वाची बातमी : नाट्यगृह आणि सिनेमागृह सुरू करण्याबाबत अमित देशमुख यांची महत्त्वाची माहिती
काही प्रसिद्धी माध्यमांनीही मुंबई पोलिसांच्या विरोधात एक मोहीम चालवली. 16 जून रोजी सुशांतचा कुटुंबियांच्या विधानामध्ये देखील त्यांनी ही आत्महत्या असल्याचे म्हटले होते. त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावलं पण कुटुंबातील सदस्य चौकशीसाठी आले नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केले.
आता याप्रकरणी सायबर पोलिसात फेक अकाऊन्ट उघडून बदनामी केल्या प्रकरणी आणि चुकीची माहीती सोशल मिडियावर टाकून दिशाभूल केल्याप्रकऱणी दोन वेगवेगळे गुन्हे नोंदवण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाच्या पोलिस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी दिली आहे.