नवी मुंबईतील विकासकामांची भरारी

नवी मुंबईतील विकासकामांची भरारी
नवी मुंबईतील विकासकामांची भरारी

नवी मुंबई : शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या वेगासोबत विकासाच्या गतीचा ताळमेळ बसवा, याकरीता महापालिकेने शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासकामांवर भर दिला आहे. पुढील महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे ही गती मंद होऊ नये, म्हणून तब्बल ५८३ कोटींची विकासकामे सर्वसाधारण सभेत प्रगतिपथावर आहेत. रस्ते, पदपथ, गटारे, समाजमंदिर, नागरी आरोग्य केंद्र यांसारख्या पायाभूत सुविधांची तब्बल २०० कोटींपेक्षा जास्त ६५ प्रस्तावित कामांना मंजुरी देण्यात आली. पुढील सर्वसाधारण सभेत बहुप्रतिक्षेत असलेला घणसोली उड्डाणपूल, ऐरोली नाट्यगृहाचा विकास आदी पायाभूत सुविधांची ३५० कोटींपेक्षा जास्त विकासकामांचे प्रस्ताव अभियांत्रिकी विभागाने तयार केले आहेत.

बेलापूरपासून दिघ्यापर्यंत विखुरलेल्या नवी मुंबई महापालिका हद्दीत पायाभूत सुविधा प्रदान करण्यास अभियांत्रिकी विभागामार्फत प्रस्ताव तयार करण्याच्या कामांना वेग आला आहे. तत्कालीन आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी जाता-जाता स्वाक्षऱ्या केल्या होत्या. त्यामुळे तब्बल २०० कोटींपेक्षा जास्त कामांना प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. याखेरीज रामास्वामींच्या कामाच्या वेगामुळे डिसेंबरपासून ऑगस्टपर्यंतच्या महिन्यातील लोकसभा निवडणुकीचे दोन महिने वगळल्यास अवघ्या पाच महिन्यांत अभियांत्रिकी विभागाला दोन हजार कोटींची विकासकामे करण्यात यश आले आहे. परंतु पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांची संभाव्य आचारसंहिता लक्षात घेता विकासकामांचा रथ कुठे थांबू नये, ही भीती अभियांत्रिकी विभागाला सतावत होती. त्यामुळे अभियांत्रिकी विभागाने विक्रमी वेळेत तब्बल ५८३ कोटींचे ११५ प्रस्ताव पटलावर सादर केले आहेत. यातील तब्बल ७० प्रस्तावांना सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाली आहे. 

उर्वरित ४५ प्रस्ताव पुढील सर्वसाधारण सभेत पटलावर घेण्यात येणार आहेत. या प्रस्तावांमध्ये वाशी विभागात हरती पट्टे, तलाव सुशोभीकरण अशी अडीच कोटींची कामे केली जाणार आहेत. बेलापूर विभागात रस्ता सुधारणा, पदपथ दुरुस्ती, पारसिक हिल प्रेक्षणीय स्थळ, नेरूळ येथे रस्त्याची सुधारणा, समाजमंदिर उभारणी आदी सुमारे सात कोटींपेक्षा जास्त रकमेच्या विकासकामांना मंजुरी मिळणार आहे. घणसोली विभागातील रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती, एमआयडीसीतील सविता केमिकल्स येथे काँक्रिटीकरणाचा रस्ता, सानपाडा येथे रस्त्याचे डांबरीकरण, घणसोली विभागातील सर्व गावांची मलनिस्सारण वाहिन्या बदलणे, अशा स्वरूपाची तब्बल दहा कोटींची कामे लवकरच सुरू होणार आहेत. 

घणसोली उड्डाणपूल
घणसोली नोडला ऐरोली नोडशी जोडणारा बहुप्रतिक्षित उड्डाणपूल अखेर महापालिकेतर्फे उभारला जाणार आहे. या उड्डाणपुलाला सिडको काहीअंशी भार उचलणार असल्याने अखेर २१८ कोटींपेक्षा जास्त अंदाजे खर्चाचा प्रस्ताव अभियांत्रिकी विभागाने तयार केला आहे. हा प्रस्तावही सर्वसाधारण सभेच्या पटलावर सादर केला आहे. आचारसंहितेच्या आधी हा प्रस्ताव पटलावर आल्यामुळे सत्ताधाऱ्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com