ठाण्यात भाजपला खिंडार? नाराज कार्यकर्ते कॉंग्रेसच्या संपर्कात...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 मार्च 2020

येत्या काळात लवकरच ठाणे जिल्ह्यात भाजपला खिंडार पडणार असल्याचे भाकीत कॉंग्रेस पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी काल सायंकाळी भिवंडीत झालेल्या कार्यक्रमात व्यक्त केले आहे.

भिवंडी : राज्यातून सत्ता जाताच भाजप पक्षाच्या नेत्यांकडून निष्ठावंत कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना सन्मानाची वागणूक दिली जात नाही. तसेच त्यांचा वेळोवेळी अवमान केला जात असल्यामुळे अनेक पदाधिकारी नेते वर्ग नाराज झाले असून ते कॉंग्रेस पक्षाच्या संपर्कात आहेत. त्यामुळे येत्या काळात लवकरच ठाणे जिल्ह्यात भाजपला खिंडार पडणार असल्याचे भाकीत कॉंग्रेस पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी काल सायंकाळी भिवंडीत झालेल्या कार्यक्रमात व्यक्त केले आहे.

ही बातमी वाचली का?...आता ऐतिहासिक किल्ल्यांवर पोलिसांचा पहारा!

भिवंडीतील डी. वाय. फाऊंडेशन या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या वतीने भिवंडी तालुक्‍यातील "सोनाळे गाव' येथे "बालाजी चषक क्रिकेट स्पर्धा' आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेचे उद्‌घाटन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आमदार रमेश पाटील, दयानंद चोरघे, भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार, पंचायत समिती माजी सभापती मोतीराम चोरघे, आर. सी. पाटील, रवींद्र चंदे, योगेश घुमाळ आदी उपस्थित होते.

ही बातमी वाचली का? मविआ सरकार येताच‘या’प्रस्तावाला मिळतीये तत्काळ मंजुरी! 
 
दयानंद चोरघे हे भाजप पक्षात आहेत. असे असताना कॉंग्रेस पक्षासह सर्व पक्षाच्या नेत्यांना ते व्यासपीठावर बोलावून आपले कार्यक्रम करीत आहेत ही कौतुकास्पद बाब आहे. सध्या भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात कुरबुरी, गटबाजी सुरू असून, नवी मुबईप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी कॉंग्रेसमध्ये येण्यासाठी धडपड करीत आहेत. लवकरच भाजपला रामराम करीत ते कॉंग्रेसमध्ये येतील. त्यांच्यासाठी कॉंग्रेस पक्षाचे दरवाजे सदैव उघडे असल्याचे प्रदेशाध्यक्ष तांबे म्हणाले. कार्यक्रमाचे आयोजक चोरघे यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करीत कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loyal workers of BJP in Thane approached the Congress