ठाण्यातील आदिवासीला `छप्पर फाड के` लॉटरी!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

रस्तारुंदीकरणात गेलेल्या जमिनीच्या मोबदल्यात मिळणार तब्बल 29 लाख रुपये

ठाणे : `देने वाला जब भी देता, देता छप्पर फाड के...` असं म्हटलं जातं. ठाण्यातील एका आदिवासीला मात्र या `छप्पर फाड के`चा प्रत्यक्ष अनुभव आलाय. त्याला लॉटरी लागली, तीही थोडी थोडकी नव्हे... तब्बल 29 कोटी रुपयांची. रस्तारुंदीकरणात गेलेल्या जमिनीच्या मोबदल्यात त्याला पालिकेकडून ही रक्कम मिळणार आहे.

सरकारी काम अथवा प्रकल्पासाठी एखादी जमीन ताब्यात घेतल्यानंतर नुकसानभरपाई मिळण्यासाठी पिढ्यानपिढ्या जाव्या लागतात. त्यातही महापालिकेकडून जमिनीच्या मोबदल्यात भरपाई आणि तीही रोख स्वरूपात मिळविण्यासाठी तर साता जन्माचे संचित जमा असावे लागते. पण या साऱ्या अंदाजांना फोल ठरवत ठाणे पालिका प्रशासनाने शहरातील आदिवासीला त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात तब्बल २९ कोटी ४५ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात भरपाई मिळणार असल्याने या आदिवासीला लॉटरीच लागल्याची चर्चा आहे.

हेही वाचा ः आधी हिरवा पाऊस, आता गुलाबी रस्ते ; नागरिक भयभीत..
 
ठाणे शहराच्या मंजूर विकास योजनेत घोडबंदर रोड येथील रस्ताची रुंदी ६० मीटर करण्यासाठी भाईंदरपाडा येथील जुना सर्व्हे क्र. २८६ आणि नवीन सर्व्हे क्र. १७ पै. या जमिनीसह ऑक्‍ट्रॉय नाका येथील जमीन बाधित होत आहे. २००० साली येथील जमीन मालकांना पालिकेकडून जमीन ताब्यात घेण्याच्या नोटिसा बजाविण्यात आल्या होत्या. त्यावेळी भूखंडधारकांपैकी कुलमुख्यत्यार पत्रधारक चंद्रकांत ठाकूर यांनी त्यांना बाधित मिळकतीचा मोबदला मिळाला नसल्याने २२ जानेवारी २०१४ ला मोबदला हा रोख स्वरुपात अथवा टीडीआर स्वरुपात देण्याची मागणी महापालिकेकडे केली होती. ही मागणी मान्य न झाल्याने पालिकेच्या विरोधात त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. 

उच्च न्यायालयाने १० मार्च २०१७ ला दिलेल्या निर्णयानुसार नवीन भूसंपादन कायदा २०१३ मधील तरतूदीनुसार भूखंडधारकांच्या संमतीत वाटाघाटीने या विषयावर निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एकूण आठ हजार ६३७ चौरस मीटर जागा बाधित होत असल्याचे निष्पन्न झाले. मात्र ही जमीन आदिवासींची असल्याने शिवाय तिचे हस्तांतरण शक्‍य नसल्याने भूसंपादनाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार आहे. तसेच या जागेच्या बदल्यात तब्बल २९ कोटी ४५ लाख रुपये देण्याची तयारी महापालिकेकडून कळविले जाणार आहे. या आशयाचा ठराव नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे. 

हेही वाचा ः #HopeofLife : मुंबई महापालिकेचे पहिले कर्करोग रुग्णालय २०२१ मध्ये

एकीकडे शहराला रुंद रस्ते उपलब्ध होण्यासाठी आपली घरे सोडून अनेक रहिवाशांना रेंटलमधील घरांमध्ये राहण्याची वेळ आली आहे. त्यांना या रेंटलच्या घरांमध्ये विविध समस्यांना सामोरे जावे लागते. पण त्यांच्यासाठी अद्याप कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात आलेली नाही. पण नुकसान भरपाईबाबत घोडबंदर रोड येथील आदिवासी कुटुंब मात्र नशीबवान ठरलेले आहेत. 

रस्ता बाधित होत असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात पालिकेकडून नुकसान भरपाई दिली जात असल्याने भविष्यात अजून काही आदिवासी तसेच घोडबंदर रोड येथील शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे.

शिवसेना-भाजप पदाधिकाऱ्यांची ‘विशेष’ धावपळ
ठाणे पालिकेच्या इतिहासात आतापर्यंत कोणालाही अशाप्रकारे एकाच वेळी २९ कोटींची नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही. पण आदिवासी बांधवांच्या पाठिशी पालिकेतील काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे ‘अर्थपूर्ण’ आशीर्वाद लाभल्यानेच या आदिवासी बांधवांना वेळेत रोख रक्कमेत कोट्यवधी रुपयांची नुकसानभरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे कळते. यासाठी पालिकेतील शिवसेनेच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने तसेच घोडबंदर रोड येथील भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याने ‘विशेष’ धावपळ केल्याचे समजते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lucky Tribal... will get compensation of INR 29 lakhs