मधुरांगणतर्फे बहारदार मनोरंजन  अंशुमनसोबत रंगली गप्पा व गाणी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

ठाणे - मराठी, हिंदी गाण्यांवरील विडंबन काव्य, अनेक जुन्या गीतांच्या चालींवर रचलेली विनोदी गाणी, कविता, उखाणे, सोबतच सुमधुर स्वरातील हिंदी-मराठी गाणी व अंशुमन विचारे यांच्यासोबत विविध विषयांवरील गप्पांसोबत ठाण्यात बहारदार मनोरंजन, असा कार्यक्रम रंगला होता. 

ठाणे - मराठी, हिंदी गाण्यांवरील विडंबन काव्य, अनेक जुन्या गीतांच्या चालींवर रचलेली विनोदी गाणी, कविता, उखाणे, सोबतच सुमधुर स्वरातील हिंदी-मराठी गाणी व अंशुमन विचारे यांच्यासोबत विविध विषयांवरील गप्पांसोबत ठाण्यात बहारदार मनोरंजन, असा कार्यक्रम रंगला होता. 

"सकाळ' मधुरांगण व अरविंद पेंडसे प्रतिष्ठान यांच्या वतीने मृणाल अरविंद पेंडसे यांचा बहारदार मनोरंजनाचा कार्यक्रम शनिवारी (ता. 24) शुभंकरोती हॉल येथे झाला होता. या कार्यक्रमात अभिनेते अंशुमन विचारे आणि त्याच्या टीमची धम्माल, सुमधुर गाण्यांच्या लयीसोबत गप्पांची मजा श्रोत्यांना लुटता आली. कार्यक्रमाला भाजप ठाणे अध्यक्ष संदीप लेले, सरचिटणीस डॉ. राजेश मढवी, स्थानिक नगरसेवक संजय वाघुले, चित्रपट लेखक हेमंत पाटील, मृणाल पेंडसे आदी उपस्थित होते. 

"वाह वाह रामजी'च्या तालावर "वाह वाह रामजी यांनाच उचला, छळतात मला', "सून सायबा सून'वर सून बाल्या सून तुझ्या घरचीच सून' अशा कोळी ठसक्‍यातील गाण्यांवर श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्यानंतर "चांदणं चांदणं झाली रात', "या कोळीवाड्याची शान', "समिंदराची देवी तू', "शिट्टी वाजली' या कोळीगीतांवर श्रोत्यांनी ठेका धरला. कार्यक्रमादरम्यान उखाण्यांवर उखाणे हा कार्यक्रम चांगलाच रंगला. "हंबरून वासराले चाटते जशी गाय' ही आईची माहिती सांगणारी कविता सर्वांनाच अस्वस्थ करणारी ठरली. "सजणा का धरिला परदेस', "नाचत ना गगनात नाथा', "ये मेरा प्रेमपत्र पढकर', "रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना' यासारख्या अनेक दर्जेदार व बहारदार गीतांनी कार्यक्रमाची रंगत उत्तरोत्तर वाढत गेली. स्नेहा दांडेकर, सुदेश पाटील, वीणा वायकूळ, गौरव दांडेकर यांनी गीते सादर केली. या वेळी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सुनंदा पटवर्धन, विद्यार्थी जान्हवी गोरे, कलाकार अनिकेत हेर्लेकर, सोहा जोशी अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.

Web Title: madhurangan by women