महाआघाडीने फुंकले प्रचाराचे रणशिंग

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

विक्रमगड मतदारसंघात बैठकांद्वारे मार्गदर्शन; एकदिलाने काम करण्याचा नारा

मोखाडा ः विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असताना युतीची बोलणी, जागावाटप आणि जागाबदलाचा तिढा सुटलेला नाही; तर दुसरीकडे विक्रमगड विधानसभेसाठी महाआघाडीची घोषणा करत उमेदवारही निश्‍चित झाला आहे. महाआघाडीने जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड या तिन्ही तालुक्‍यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन प्रचाराला सुरुवात केली आहे. या बैठकीत ‘अभी नही तो कभी नही’ ची घोषणा नेत्यांनी दिल्याने, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी एकदिलाने काम करण्याचा नारा दिला आहे. 

पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभांमध्ये विक्रमगड विधानसभेची जागा प्रतिष्ठेची मानली जाते. या मतदारसंघावर भाजपचे एकहाती वर्चस्व आहे; मात्र गेल्या वर्षी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिवसेनेनेही दावा केला आहे; तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या आघाडीच्या उमेदवाराला आठ हजार मतांनी पिछाडीवर राहावे लागले होते. त्याचा वचपा चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाआघाडीने घेतला आहे. या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारापेक्षा पाच हजार ७०५ मतांची आघाडी घेतल्याने, महाआघाडीच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. 

यंदा आघाडीला बहुजन विकास आघाडी आणि कम्युनिस्ट पक्षाचे बळ मिळाले असून लोकसभा निवडणुकीतील मिळालेली मतांची आघाडी, एकमताने झालेली उमेदवाराची निवड; तसेच प्रत्येक तालुक्‍यात झालेल्या विभागवार बैठकांमुळे महाआघाडीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. मतदारसंघाच्या मध्यवर्ती जव्हार येथे झालेल्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बुथप्रमुखांच्या बैठकीत  ‘अभी नही तो कभी नही’चा नारा देत महाआघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करण्याचा निर्धार केला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रमगड विधानसभा अध्यक्ष प्रमोद कोठेकर यांनी सांगितले. 

बुथप्रमुखांच्या बैठकांवर भर
मतदारसंघात युतीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची दिलजमाई न झाल्याचा फटका लोकसभा निवडणुकीत बसला होता; मात्र मतांची बढत मिळाल्याने महाआघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले आहे. त्यातच युतीमध्ये मतदारसंघ कोणाच्या वाटेला जाणार आणि कोणं उमेदवार ठरणार हे अद्यापही अस्पष्ट आहे; तर दुसरीकडे महाआघाडीचा उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे पालघर जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा यांचे नाव निश्‍चित झाल्याने, त्यांनी विक्रमगड विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या जव्हार, मोखाडा, विक्रमगड आणि वाडा तालुक्‍यातील कंचाड जिल्हा परिषद गटात पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बुथप्रमुखांच्या बैठका घेण्याचा सपाटा लावला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahaaaghadis propaganda Guidance through meetings in Vikramgarh constituency/