चवदार तळे वर्धापनदिन रद्द

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 मार्च 2020

20 मार्च हा अत्यंत महत्त्वाचा दिवस जरी असला तरी कोरोनाच्या दहशतीमुळे त्या दिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द करून प्रशासनाला सहाकार्य करावे, असे आवाहन प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी केले.

मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता येत्या 20 मार्चला होणारा महाडमधील चवदारतळे सत्याग्रहाचा वर्धापनदिन कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय आज महाड प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीला विविध संघटनांचे व चळवळींतील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

कोरोना तपासणीसाठी मुंबईत आणखी दोन प्रयोगशाळा
 
देशामध्ये कोरोनाने दहशत निर्माण केली आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारच्या आदेशानुसार योग्य ती काळजी घेणे आवश्‍यक आहे. 20 मार्च हा अत्यंत महत्त्वाचा दिवस जरी असला तरी कोरोनाच्या दहशतीमुळे त्या दिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द करून प्रशासनाला सहाकार्य करावे, असे आवाहन प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी केले. महाड येथील ऐतिहासिक चवदारतळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 ला सत्याग्रह केला. त्यानंतर हा दिन समतादिन म्हणून गेली अनेक वर्षे उत्साही वातावरणात साजरा केला जात आहे.

या वर्षी कोरोनाची दहशत जगामध्ये पसरली असून, या विषाणूपासून बचाव करण्यासाठी सरकारने निर्देश दिले असल्याचे प्रांताधिकारी इनामदार यांनी सांगितले. साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू असून, त्याचे काटेकोर पालन करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आल्याने 20 मार्चला होणाऱ्या कार्यक्रमामध्ये गर्दी करू नये. त्याचबरोबर नियोजित कार्यक्रम रद्द करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत असल्याचे इनामदार यांनी सांगितले. महाड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर जगताप यांनी कोरोनाविषयी माहिती दिली. आजाराचा विचार केल्यास मोठ्या प्रमाणांमध्ये लोकांचा समूह जमवू नये, सभा, संमेलने भरवू नये, त्याचबरोबर सामाजिक कार्यक्रम रद्द करण्यात यावेत अशा सूचना दिल्या.
 
बैठकीला तहसीलदार चंद्रसेन पवार, मुख्याधिकारी जीवन पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर जगताप, पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी सुनील यमगर, महाड आगराचे व्यवस्थापक अनंत कुलकर्णी, पोलिस निरीक्षक शैलेश सणस, पंकज गिरी, तालुका आरोग्य अधिकारी एजाज बिरादार, दलित मित्र मधुकर गायकवाड, विनायक हाटे, विश्‍वनाथ सोनावणे, कोकण रिपब्लिकन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मोरे, तालुका आरपीआय अध्यक्ष मोहन खांबे, आंबेडकर चळवळीतील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mahad-chavdar tale program cancel-corona effect

टॉपिकस