महाडने मोडला नाही कणा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

महाड शहरातील घाऊक व्यापारी राजेश शेठ यांचे नदीकिनारीच दुकान आहे. त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. अन्नधान्य भिजून गेले. परंतु तरीही न खचता त्यांनी दुसऱ्या दिवशीपासून दुकान सुरू केले. "व्यवसायात नफा-तोटा ही गणिते असतातच. व्यवसाय हेच साधन असल्याने पर्याय शोधला पाहिजे, असे राजेश शेठ यांनी सांगितले. 

महाड : "मोडून पडला संसार तरी मोडला नाही; कणा पाठीवरती हात ठेवून, फक्त लढ म्हणा' कुसुमाग्रजांच्या कणा या कवितेतल्या ओळी महाडमध्ये ठिकठिकाणी अनुभवयास मिळत आहेत. शहरात 6 ऑगस्टच्या रात्री आलेल्या महापुराने अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त केले. चुली विझल्या. व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. परंतु या आपत्तीतही महाडकर सावरले. ते खंबीरपणे उभे राहत आहेत. महाडच्या या "स्पिरीट'ला आता संपूर्ण जिल्ह्याने सलाम केला आहे. 

महाडला पूर नवीन नाही. सावित्रीचे पाणी अंगणात आले नाही, तर महाडकरांना त्या वर्षी पाऊस पडलाच नाही, असे वाटते. परंतु 6 ऑगस्टला 2005 सारखी आपत्ती ओढवली होती. पुरासंबंधीचा अनेकांचा अंदाज खोटा ठरला. शहरातील सर्वच भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी शिरले. 

अनेक व्यापाऱ्यांची दुकाने बुडून गेली. कपडेलत्ते भिजून गेले. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. परंतु या संकटातही महाडकर शांत होते. त्यांनी दोन-चार दिवसांत नेहमीप्रमाणे साफसफाईला सुरुवात केली. दुकाने सजवली. घरे स्वच्छ केली. आता तर पुन्हा नव्या जोशात सर्व व्यवहार सुरू झाले आहेत. बॅंका, दवाखाने सुरू झाल्याने रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. बाजारपेठेतील दुकाने उघडल्याने सणावारामुळे पुन्हा ग्राहकांची गर्दी वाढली आहे. 

शहरातील घाऊक व्यापारी राजेश शेठ यांचे नदीकिनारीच दुकान आहे. त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. अन्नधान्य भिजून गेले. परंतु तरीही न खचता त्यांनी दुसऱ्या दिवशीपासून दुकान सुरू केले. "व्यवसायात नफा-तोटा ही गणिते असतातच. व्यवसाय हेच साधन असल्याने पर्याय शोधला पाहिजे, असे राजेश शेठ यांनी सांगितले. 

बाजारपेठेतील राकेश महता हे किरकोळ व्यापारी सरकारला दोष देत नाहीत. नुकसान होऊनही महाडमधील मोठे व्यापारी आणि काही उत्पादक विश्वासाने माल देत असल्याने पुन्हा उभे राहू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कारखानदार अशोक तलाठी यांनी शांत बसलो, तर माघार घ्यावी लागेल. पुढे जायलाच हवे. संकटे येत राहणार, अशी प्रतिक्रिया दिली. 

महाडमध्ये घरे आणि छोटी दुकाने एकत्र आहेत. ही कुटुंबे नुकसान सहन करून कामाला लागली आहेत. 
विशेष म्हणजे सरकारी मदत, पंचनामे, नेत्यांचे दौरे याची वाट न पाहता महाडकर पुन्हा उभे राहिले आहेत. बाजारपेठेत फेरफटका मारला तर येथे पुराच्या कोणत्याही खुणा दिसणार नाहीत, अशी उभारी घेतली आहे. त्यामुळेच जिल्ह्यात या शहरातील रहिवाशांच्या उमेदीला सलाम करण्यात येत आहे. 

आशा कायम 
व्यावसायिकांनी भिजलेल्या वस्तूंच्या किमती कमी केल्या आहेत. कोटेश्वरी तळे येथे डेअरी व्यवसाय करणारे आरोक्‍य दास यांच्या दुकानातील सर्व सामान, फ्रिज भिजले आहे. त्यानंतरही ते नव्या आशेने व्यवसाय करत आहेत. गणेश कारखान्यांनाही पुराने सोडले नाही. मातीच्या मूर्ती भिजल्याने पुन्हा मेहनत करावी लागणार आहे, असे मूर्तिकार सुनील जाधव यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahad's stubbornness remains