उल्हासनगरातील ‘महक’ इमारत कोसळली

कोसळलेली महक इमारत (छायाचित्र : ऋषिकेश चौधरी)
कोसळलेली महक इमारत (छायाचित्र : ऋषिकेश चौधरी)

उल्हासनगर : उल्हासनगरातील फर्निचर बाजारातील ‘महक’ ही पाच मजल्याची इमारत सोमवारी (ता. १२) सकाळी झुकली होती. येथील घरांचे दरवाजे आपोआप जाम झाल्याने ३१ सदनिकाधारकांना पालिकेने बाहेर काढण्यात आले होते. मात्र मंगळवारी ही इमारत अक्षरशः पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. जाम झालेल्या दरवाजाने काळ आल्याचे संकेत दिल्याने आणि पालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व रहिवाशांना बाहेर काढल्याने १५० जणांचे प्राण वाचले आहेत. 

पालिकेने जाहीर केलेल्या अतिधोकादायक तसेच धोकादायक इमारतींच्या यादीत या इमारतीचा समावेश नव्हता. मात्र सोमवारी ही इमारत झुकल्याने सदनिकाधारकांचे दरवाजे जाम झाले. प्रयत्न करूनही दरवाजे उघडत नव्हते. दरम्यान, सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, भगवान कुमावत, अग्निशमन अधिकारी भास्कर मिरपगार यांनी धाव घेऊन जाम झालेले दरवाजे उघडून रहिवाशांना बाहेर काढून इमारत खाली केली होती.

एका नामचीन वास्तुविशारदाने मंगळवारी या इमारतीची पाहणी करत इमारतीला खांबांचा आधार दिल्यास सर्व व्यवस्थित होणार, असा धीर दिला. मात्र वास्तुविशारद गेल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच ही इमारत कोसळली. 

दरम्यान, बेघर झालेल्या रहिवाशांना थायरासिंग दरबारात आश्रय देण्यात आला आहे. २६ जुलै व ४ ऑगस्ट रोजी उल्हासनगरात तसेच कांबा-वरप-रायता या गावात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा थायरासिंग दरबारचे संत जस्सू सिंग व टिल्लू सिंग यांनी पूरग्रस्तांसाठी जेवणाची व्यवस्था केली होती.

दागिने घेऊन बाहेर पडलो
दरवाजे जाम झाल्यावर आणि फोन केल्यावर माजी नगरसेवक नरेंद्रकुमारी ठाकूर, नारायण पंजाबी, पालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, भगवान कुमावत, अग्निशमन अधिकारी भास्कर मिरपगार यांनी इमारत खाली करण्यात येत आहे. दागिने-रुपये-कपडे-मुलांची पुस्तके सोबत घ्या असे सांगितले. आता आमच्याकडे याव्यतिरिक्त काहीच नाही, असे इमारतीतील रहिवासी आर. जी. भाटिया यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com