महापरिनिर्वाण दिनासाठी मुंबई पालिका देणार सेवा-सुविधा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai-municipal-corporation

यंदाच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तची व्यवस्थेसाठी मुंबई महापालिकेच्या कोविड पूर्व परिस्थितीनुरुप अर्थात सन २०१९ च्या धर्तीवर करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले.

महापरिनिर्वाण दिनासाठी मुंबई पालिका देणार सेवा-सुविधा

मुंबई - यंदाच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तची व्यवस्थेसाठी मुंबई महापालिकेच्या कोविड पूर्व परिस्थितीनुरुप अर्थात सन २०१९ च्या धर्तीवर करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले. मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त नुकतीच समन्वय बैठक पार पडली. 

या बैठकीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्‍वय समितीचे व संबंधित संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. पालिकेच्या परिमंडळ २ चे उप आयुक्त रमाकांत बिरादार यांनी ६ डिसेंबर २०२२ च्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध सेवा-सुविधांची माहिती उपस्थितांना संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली. यामध्ये प्रामुख्याने नियंत्रण कक्ष, सुशोभिकरण, टेहाळणी मनोरा, निर्देशक फुगा, छायाचित्रांचे प्रदर्शन, रांगेतील व्यवस्था, शासकीय मानवंदना, हेलिकॉप्टर पुष्पवृष्टी, माहिती पुस्तिका, स्वच्छता व्यवस्था, वैद्यकीय व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रसाधनगृहे, निवासी मंडप, विद्युत व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, अग्निशमन व्यवस्था, इत्यादी बाबींची माहिती उपस्थितांना देण्यात आली. 

महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी सांगितले की, मुंबई महानगरपालिकेद्वारे सन २०१९ मध्ये दादर येथील चैत्यभूमी व शिवाजी पार्क परिसरात पुरविण्यात आलेल्या व्यवस्थेच्या व सोयी-सुविधांच्या धर्तीवर यंदाचे नियोजन करण्यात येत आहे. तथापि, याबाबत ज्या ठिकाणी गरज असेल, त्या ठिकाणी अधिक प्रमाणात सेवा-सुविधांचे नियोजन करण्याचेही निर्देश त्यांनी आजच्या बैठकी दरम्यान दिले. तसेच सर्व यंत्रणांनी आपापसात सुयोग्‍य समन्‍वय साधून कार्यवाही करण्याचे आणि अधिकाधिक प्रभावीपणे सेवा-सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले.