महापे-शिळफाटा रस्ता अंधारात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

नवी मुंबई औद्योगिक क्षेत्रामधून जात असणाऱ्या सहा किलोमीटरच्या महापे-शिळफाटा रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.

नवी मुंबई : नवी मुंबई औद्योगिक क्षेत्रामधून जात असणाऱ्या सहा किलोमीटरच्या महापे-शिळफाटा रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. विशेष म्हणजे शिळफाट्यापासून महापेपर्यंत असणाऱ्या रस्त्याच्या बाजूला पथदिव्यांचे खांबच उभारण्यात आले नसल्याचे निदर्शनास येत आहे. या अंधारामुळे अनेक वाहनचालकांना लुटण्याचे प्रकारदेखील या मार्गावर घडत आहे.

महापे-शिळफाटा  रस्त्याचे काम एमएमआरडीकडून करण्यात आले आहे. हा रस्ता नवी मुंबई व शिळफाट्याला जोडणारा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यामुळे कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूरला जाणे सोईस्कर झाले आहे. या रस्त्यावरून हजारो वाहने जातात; मात्र या रस्त्याचे काम होऊनदेखील येथे पथदिवेच बसवण्यात आलेले नाहीत. पथदिवे बसवल्यानंतर त्याचे वीजबिल कोणी भरायचे, या वादावरून पथदिवेच बसवण्यात आले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

महापे-शिळफाटा रस्त्यावर पडलेल्या खड्डयांतून वाहन चालवणे जिकरीचे होत आहे. तरी प्रशासनाने या ठिकाणी पथदिवे सुरू करावे. 
-सोमनाथ निचळ, प्रवासी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mahape-shilaphata road in the dark