कोरोनाची दुसरी लाट येणार नाही याची खबरदारी घ्या; मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

uddhav thackeray
uddhav thackeray

मुंबई : महाराष्ट्रातील मृत्यू दर कोणत्याही परिस्थितीत कमी झालाच पाहिजे. कोणीही गाफील राहू नका. कोरोनाची दुसरी लाट आपल्याकडे येणार नाही, यासाठी रुग्ण आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना शोधणे, कंटेनमेंट क्षेत्रांवर अधिक लक्ष, रुग्णांवर वेळीच उपचार याबाबत हलगर्जीपणा करू नये, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. 

सर्व विभागीय आयुक्त, पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवाल, टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित हे सहभागी झाले होते.

रुग्णांकडून जादा शुल्क आकारणी गंभीर :

खासगी रुग्णालयांतील 80 टक्के बेड्स राखीव न ठेवणे आणि रुग्णांच्याकडून जादा खर्च घेण्याच्या तक्रारी येत आहेत, ही गंभीर बाब आहे. जिल्हा प्रशासन आणि महापालिकांनी संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करावी. बेड्स आणि रुग्णवाहिका नियोजन हा महत्वाचा भाग आहे, याकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे.

प्रमुख शहरांमध्ये जम्बो सुविधा :  
मुंबईत उपलब्ध वैद्यकीय साधन सुविधांचे उत्तम नियोजन करून ही साथ आटोक्यात आणण्यात आली. मुंबईच्या धर्तीवर राज्यातील इतर मोठ्या शहरांमध्येही जम्बो हॉस्पिटल उभारण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल. कोरोनाचा प्रादुर्भाव विशेषत: डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये पसरत आहे. तो रोखणे खूप गरजेचे आहे. या आरोग्य सेवकांना संरक्षित करणे व त्यासाठी त्यांना तशा स्वरूपाचे प्रशिक्षण द्यावे लागेल. 

केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवाल काय म्हणाले?
- कंटेन्मेंट झोनमधील घरोघरी भेटी सुरू ठेवाव्यात
- रुग्णाचे 80 टक्के संपर्क शोधून 72 तासांच्या आत चाचण्या कराव्यात
- नवीन हॉटस्पॉटवर लक्ष द्यावे
- एन्टीजेन चाचणी निगेटिव्ह आली तरी अतिआत्मविश्वास न ठेवता लक्षणानुसार आरटीपीसीआर चाचणी करावी
- रुग्ण सेवा, रुग्णालय व्यवस्थापनाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे 
- वृद्ध आणि इतर आजार असलेल्यांनी लवकर रुग्णालयात यावे

दहा प्रमुख जिल्ह्यांवर लक्ष 
राज्यातील पुणे, ठाणे, मुंबई, नाशिक, नगर, रायगड, जळगाव, नागपूर, पालघर, सांगली या दहा जिल्ह्यांमधून गेल्या आठवड्यात 79 टक्के रुग्ण आढळले आहेत. 
महाराष्ट्राचा मृत्यू दर 3.47 टक्के असून, देशाचा मृत्यू दर 2.07 टक्के आहे. 
पुणे 2.37 टक्के, ठाणे 2.72 टक्के, मुंबई 5.50 टक्के, नाशिक 2.82 टक्के, औरंगाबाद 1.97 टक्के, कोल्हापूर 2.53 टक्के, रायगड 2.78 टक्के , पालघर 1.93 टक्के, जळगाव 4.51 टक्के, नगर 1.19 टक्के .

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com