esakal | मुख्यमंत्री उद्या करणार संपूर्ण लॉकडाउनची घोषणा

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray
मुख्यमंत्री उद्या करणार संपूर्ण लॉकडाउनची घोषणा
sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाच्या प्रसारावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. सर्वप्रथम दिवसा संचारबंदी, त्यानंतर नाईट कर्फ्यू आणि त्यानंतर वीकेंड लॉकडाउन अशा उपाययोजना करण्यात आल्या. तरीदेखील राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या अटोक्यात येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे अखेर १५ एप्रिलपासून राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले. केवळ अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या लोकांनाच घराबाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली. तर, अर्थचक्र सुरू राहावं यासाठी हॉटेल्सना घरपोच सेवा सुरू ठेवण्याची मुभा मिळाली. तसेच काही अंशी उद्योगधंदे सुरू ठेवण्याचाही निर्णय झाला. पण तरीदेखील राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढतच असल्याने आता पहिल्या लॉकडाउनसारखा लॉकडाउन लावण्यात येणार असल्याचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

हेही वाचा: "लॉकडाउन संपू दे, मग देवेंद्र फडणवीसांना..."

उद्या रात्री मुख्यमंत्री करणार लॉकडाउन जाहीर

"उद्यापासून राज्यात संपूर्ण लॉकडाउनची घोषणा करा अशी विनंती मंत्रिमंडळातील सर्वच मंत्र्यांनी आज मुख्यमंत्र्यानी केली. उद्या रात्री ८पासून राज्यात संपूर्ण लॉकडाउन लावला जावा अशी मंत्रिमंडळाची मागणी आहे. त्यानुसार उद्या ८ वाजता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाउनची घोषणा करतील", अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

हेही वाचा: ब्रेकिंग : दहावीच्या परीक्षा रद्द; बारावीच्या परीक्षा होणार!

संपूर्ण लॉकडाउनबद्दलची नवी नियमावली लवकरच

"राज्यातील वैद्यकीय ऑक्सिजनची कमतरता पाहता राज्यात आणखी रूग्ण वाढ होणं महाराष्ट्राला परवडणारं नाही. त्यामुळे आता राज्यात संपूर्ण लॉकडाउन लागणार आहे. संपूर्ण लॉकडाउनबद्दलची नवी नियमावली लवकरच जारी केली जाईल", असं राज्याचे मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी सांगितलं.

हेही वाचा: राज्यात होणार आठ दिवसांचा कडक लॉकडाउन ! जाणून घ्या नेमके कारण

नव्या नियमावलीत जिल्हाबंदीचाही समावेश?

राज्यात निर्बंध लादूनही रूग्ण संख्या झपाट्याने वाढतच आहे. विविध उपाययोजनांचा आधार घेऊनही राज्यात कोरोना प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. अनेक ठिकाणी लोक विनाकारण रस्त्यावर भटकताना दिसत आहेत. राज्यात जिल्हाबंदी होणार का? इतर कोणते निर्णय लागू केले जाणार.. याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला संबोधित करतील. पण हा लॉकडाउन सुरूवातीच्या लॉकडाउन प्रमाणेच कडक स्वरूपाचा असेल", असं सूचक वक्तव्य राज्याचे मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केली.