
नवी मुंबई : पनवेल, सिडको वसाहती आणि जेएनपीए परिसराचा पाणीप्रश्न सोडवणारी न्हावा-शेवा टप्पा क्रमांक ३ या योजनेचे काम रेंगाळले आहे. भूमी अधिग्रहण, बेकायदा बांधकामे, भूमिगत गॅसवाहिन्या, सरकारी कंपन्या आणि रेल्वे प्राधिकरणाकडून हव्या असणाऱ्या परवानग्या मिळवण्यात झालेला विलंब आदी कारणांमुळे या योजनेला उशीर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी कबुली दिली, मात्र या प्रकल्पाचे ६७ टक्के काम पूर्ण झाले असून, मार्च २०२६ पर्यंत पाणीपुरवठा योजना प्रत्यक्ष सुरू होईल, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून सांगण्यात आले.