esakal | "म्हणून घेतला संपूर्ण लॉकडाउनचा निर्णय!"; मंत्र्याचं स्पष्टीकरण

बोलून बातमी शोधा

Lockdown

"म्हणून घेतला संपूर्ण लॉकडाउनचा निर्णय!"; मंत्र्याचं स्पष्टीकरण

sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: राज्यातील रूग्णांची संख्या सध्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या प्रसारावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. दिवसा संचारबंदी, नाईट कर्फ्यू, वीकेंड लॉकडाउन, अतिशय कडक निर्बंध अशा सर्व पर्यायांचा आधार घेऊनही राज्याची रूग्णसंख्या आटोक्यात येताना दिसत नाही. त्यामुळे अखेर राज्यात संपूर्ण लॉकडाउन करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या संबंधी उद्या मुख्यमंत्री घोषणा करणार असल्याची माहिती दिली. त्यानंतर एक पत्रकार परिषद घेत राज्याच्या मंत्रिमंडळावर संपूर्ण लॉकडाउनचा निर्णय घेण्याची वेळ का आली? याचं उत्तर राज्याचे मंत्री अनिल परब यांनी दिलं.

हेही वाचा: Lockdown 2.0: मुंबई लोकल सेवाही बंद होणार?

"लॉकडाउनची घोषणा उद्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार असून त्या संबंधीची नवीन नियमावली ते स्वत: जाहीर करतील. त्यांनी जाहीर केलेली नियमावली ही अंतिम असणार आहे. सध्या राज्यातील रूग्ण संख्या इतक्या वेगाने वाढत आहे की वैद्यकीय कर्मचाऱ्यांचीही काम करण्याची मर्यादा संपत आली आहे. महाराष्ट्राला ऑक्सिजनच्या टंचाईवर लवकरच मात करणं शक्य होईल. पण सध्याची परिस्थिती पाहता राज्यात जर अजून रूग्णसंख्या वाढली व ऑक्सिजन मिळू शकला नाही तर हाहाकार माजेल. त्यामुळे राज्य सरकारने संपूर्ण लॉकडाऊनचा कठोर पण महत्त्वाचा निर्णय घेतला आहे", असं मंत्री परब यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा: मुख्यमंत्री उद्या करणार संपूर्ण लॉकडाउनची घोषणा

"कोरोना वाढत आहे. कडक निर्बंध लादूनही जनता रस्त्यावर उतरते आहे. या साऱ्या गोष्टींबद्दल पूर्ण चर्चा झाली. या साऱ्या गोष्टींबद्दल मुख्यमंत्री उद्या बोलतील. लॉकडाऊन नक्की कसा असेल? हे मुख्यमंत्री सांगतील. वैद्यकीय सुविधा अपुरी पडते आहे. संसर्ग टाळायचा असेल तर संपर्क कमी करायला हवा आणि त्यासाठी लॉकडाऊनसारखं कडक पाऊल उचललं जातंय", असं परब यांनी सांगितलं.

"शासनाच्या विविध विभागांमधील मालवाहतुकीमधील २५ टक्के मालवाहतूक ही एसटीकडे द्यावी, असा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. यामुळे एसटी तोट्यातून बाहेर काढण्यास मदत होईल. शासकीय वाहनांची दुरूस्तीही एसटीच करेल", असंही त्यांनी नमूद केलं.