esakal | Lockdown 2.0: मुंबई लोकल सेवाही बंद होणार?

बोलून बातमी शोधा

Mumbai Local Train

Lockdown 2.0: मुंबई लोकल सेवाही बंद होणार?

sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: राज्यात कोरोना रूग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. कोरोनाच्या प्रसारावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. सर्वप्रथम दिवसा संचारबंदी करण्यात आली. नंतर नाईट कर्फ्यू आणि वीकेंड लॉकडाउनचा पर्यायही स्वीकारण्यात आला. तरीही राज्यातील नव्याने वाढणारी रूग्णसंख्या अपेक्षेप्रमाणे कमी झाली नाही. त्यामुळे राज्यात केवळ कडक निर्बंध न लावता संपूर्ण लॉकडाउन करण्याची गरज असल्याची चर्चा आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत झाली. राज्याच्या मंत्र्यांनी राज्यात संपूर्ण लॉकडाउन जाहीर करण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. त्यानुसार उद्या मुख्यमंत्री जनतेला संबोधित करणार आहेत. या लॉकडाउनची नवी नियमावली लवकरच जाहीर केली जाणार असून लोकल सेवेबद्दल राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.

हेही वाचा: "लॉकडाउन संपू दे, मग देवेंद्र फडणवीसांना..."

"आता संपूर्ण लॉकडाउन होणारच हे नक्की. हा लॉकडाउन कमीत कमी १५ दिवसांचा असणार. अख्खा महाराष्ट्र बंद करणार. सगळी दुकानं बंद झाली आणि सगळी ऑफिसं बंद झाली तर मुंबई लोकलमध्ये येणार कोण? कशाला येणार? पोलीस कर्मचारी सर्वत्र लक्ष ठेवून आहेत. लोकलच्या स्टेशन्सवर पोलिसांचं लक्ष आहे. ऑफिसमध्ये किंवा दुकानात जायचंय नाही तर आपोआपच लोकल रेल्वे सेवा बंद पडेल", असे सूचक संकेत देत त्यांनी लोकल बंदी होण्याचीही शक्यता वर्तवली.

हेही वाचा: मुख्यमंत्री उद्या करणार संपूर्ण लॉकडाउनची घोषणा

राज्याचे इतर मंत्री म्हणातात...

राज्यात निर्बंध लादूनही रूग्ण संख्या झपाट्याने वाढतच आहे. विविध उपाययोजनांचा आधार घेऊनही राज्यात कोरोना प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. अनेक ठिकाणी लोक विनाकारण रस्त्यावर भटकताना दिसत आहेत. राज्यात जिल्हाबंदी होणार का? इतर कोणते निर्णय लागू केले जाणार.. याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला संबोधित करतील. पण हा लॉकडाउन सुरूवातीच्या लॉकडाउन प्रमाणेच कडक स्वरूपाचा असेल- मंत्री एकनाथ शिंदे

उद्यापासून राज्यात संपूर्ण लॉकडाउनची घोषणा करा अशी विनंती मंत्रिमंडळातील सर्वच मंत्र्यांनी आज मुख्यमंत्र्यानी केली. उद्या रात्री ८पासून राज्यात संपूर्ण लॉकडाउन लावला जावा अशी मंत्रिमंडळाची मागणी आहे. त्यानुसार उद्या ८ वाजता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाउनची घोषणा करतील- आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्यातील वैद्यकीय ऑक्सिजनची कमतरता पाहता राज्यात आणखी रूग्ण वाढ होणं महाराष्ट्राला परवडणारं नाही. त्यामुळे आता राज्यात संपूर्ण लॉकडाउन लागणार आहे. संपूर्ण लॉकडाउनबद्दलची नवी नियमावली लवकरच जारी केली जाईल- मुंबईचे पालकमंत्री असलम शेख