रिपब्लिकन ऐक्‍यासाठी तरूण आग्रही

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 डिसेंबर 2017

मुंबई - रिपब्लिकन ऐक्‍य व्हायला हवे मात्र ते होत नाही. आम्हाला खूप वाटते, सर्वांनी एकत्र यावे, पण राजकीय नेत्यांना तसे वाटत नाही, अशी भावना व्यक्त करत आंबेडकर तरुणांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकरांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर या तरुणांना रिपब्लिकन पक्षांच्या ऐक्‍याबाबत विचारले असता त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने तरूणांमध्ये ऐक्‍याचा नारा दिला जात होता. मात्र रिपब्लिकन नेते ऐक्‍यासाठी तयार होत नसल्यामुळे त्यांनी चिंता व्यक्त केली. डॉ. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्‍वभूमीवर ऐक्‍यवादी तरूण दरवर्षी ऐक्‍यासाठी आग्रह धरतात. विविध गटातटातील नेत्यांना एकत्र आणण्यासाठी ते प्रयत्न करतात. शिवाजी पार्कवर विविध गटांच्या सभाही घेतात. ऐक्‍यासाठी अनेक गट पुढाकार घेतात; मात्र ऐक्‍य होत नाही. राजकीय नेते एकत्र येत नाहीत असा अनुभव आहे. या वेळी ऐक्‍यासाठी अद्याप कोणताही गट पुढे आलेला नाही. बुलढाण्याहून आलेला गणेश वाकळे हा तरूण म्हणाला की, रिपब्लिकन ऐक्‍य व्हावे असे आम्हाला वाटते. सर्व नेते एकत्र आले आणि ऐक्‍य झाले तर मोठी ताकद निर्माण होईल. राज्यात दलितांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा बसेल. वर्षानुवर्षे ऐक्‍याचा विषय निघतो. मात्र ऐक्‍य काही होत नाही. ऐक्‍य व्हावे असे वाटून त्याचा उपयोग नाही अशी खंत त्यांने व्यक्त केली. 

नांडेदहून राजेश लांडगे हा तरूण सोळा तरूणांसोबत चैत्यभूमीवर आला होता. तो म्हणाला नांदेडमध्ये आंबेडकरी जनतेची मोठी ताकद आहे. एका जिल्ह्यात ऐक्‍य होवू शकते. मग मोठ्या नेत्यांचे ऐक्‍य का होत नाही, ऐक्‍य झाले पाहिजे. त्यातून प्रश्‍न सुटतील. मोठी ताकद उभी राहिल. पण या नेत्यांना कोण सांगणार अशी हतबलता त्याने व्यक्त केली. 

आशादायी सूर 
विलास वाघमारे या तरूणाने मात्र आशादायी सूर आळवला. एके दिवशी ऐक्‍य होईल. दलितांची राजकीय ताकद उभी राहिल. त्यातून दलितांवर होणारे अत्याचार व अन्याय थांबण्यास मदत होईल. 

Web Title: maharashtra news RPI