महत्त्वाची बातमी. : भाजपने केली विरोधात बसायची तयारी?

टीम ई-सकाळ
Sunday, 10 November 2019

राज्यात जनतेने महायुतीला कौल दिला असला तरी, भाजप-शिवसेना मित्र पक्षात मुख्यमंत्रिपदावरून बिनसलं. शिवसेना 50-50च्या फॉर्म्युल्यावर ठाम राहिली तर, भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्यास नकार दिला.

मुंबई : महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप यांच्यातील मुख्यमंत्रिपदाचा वाद आता टोकाला गेल्याचे दिसत आहे. सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून, राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिले असले तरी, भाजपने विरोधात बसण्याची तयारी केल्याची माहिती मिळत आहे. या संदर्भात पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्याशीही चर्चा झाल्याची माहिती आहे.

शिवसेनेला मुख्यमंत्रिपद नाहीच; भाजपने दिला निरोप

काय घडलं भाजपच्या बैठकीत? 
राज्यात जनतेने महायुतीला कौल दिला असला तरी, भाजप-शिवसेना मित्र पक्षात मुख्यमंत्रिपदावरून बिनसलं. शिवसेना 50-50च्या फॉर्म्युल्यावर ठाम राहिली तर, भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्यास नकार दिला. जवळपास गेल्या 15-20 दिवसांत दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला असताना, काल राज्यपाल भगतसिंग कोश्यार यांनी सर्वांत मोठा पक्ष असलेल्या भाजपला सत्तेसाठी निमंत्रित केले. त्यावर आज दुपारी भाजपच्या राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक झाली. त्यात ठाम निर्णय होऊ शकला नाही. त्यानंतर पुन्हा दुपारी बैठक घेण्यात आली. त्यात शिवसेनेला मुख्यमंत्रिपद (अडीच वर्षांसाठी) न देण्यावर भाजप नेते ठाम राहिल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे जर, शिवसेनेने सत्ता स्थापन केली तर, आपण विरोधात बसू, असा निर्णय भाजप नेत्यांनी घेतल्याची माहिती मिळत आहे. 

काँग्रेस महाराष्ट्राचा शत्रू नाही : संजय राऊत

शिवसेनेपुढे आव्हान
मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजप यांचा संसार मोडण्याच्या परिस्थितीत आहे. आज, शिवसेना मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही असताना, भाजपने विरोधात बसण्याची तयारी केल्याने आता शिवसेनेपुढे आव्हान निर्माण होण्याची चिन्हे आहेत. भाजप शिवाय राज्यात सत्ता स्थापन करून, ते टिकवण्यासाठी शिवसेना तारेवरची कसरत करावी लागण्याची चिन्हे आहेत. 

देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, असा जनतेचा कौल होता. आम्ही अजूनही पॉझिटिव्ह आहोत. अजूनही भाजप आणि शिवसेना यांच्यात हिंदुत्वाचा मोठा धागा आहे. राजकीय महत्त्वाकांक्षा असणं काही गैर नाही. पण, देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा होते.
- राम कदम, नेते भाजप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra political updates bjp ready to stay in opposition