
मुंबई लोकलबद्दल महापौर पेडणेकर यांनी दिली महत्त्वाची अपडेट
लोकल सेवा सर्वांसाठी कधी सुरू होणार? असा सवाल विचारला जातोय
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने नुकताच महाराष्ट्र अनलॉक (Maharashtra Unlock) करण्याबाबतची नियमावली (Guidelines) जाहीर केली. ५ टप्प्यातील या नियमावलीत मुंबईचा (Mumbai) समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईची लोकल सेवा (Mumbai Local Trains Services) अद्याप सर्वांसाठी सुरू करण्यात आलेली नाही. महिलांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याबाबत राज्य सरकारने सकारात्मकता दाखवली होती, पण मुंबई पालिकेने (Mumbai BMC) सावधानतेचा उपाय म्हणून ही परवानगी नाकारली. त्यामुळे मुंबईकरांसाठी लोकल सेवा कधी सुरू होणार असा प्रश्न उपस्थित झाला होता. या प्रश्नाचं आज महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईत उत्तर दिले. (Maharashtra Unlock BMC mayor Kishori Pednekar gives Update about Mumbai Local Trains Services)
"मुंबईचा समावेश सध्या तिसऱ्या टप्प्यात झाला आहे. त्यामुळे सर्व दुकाने चार वाजेपर्यंत सुरू राहतील. बससेवादेखील सुरू असणार आहेत. बेस्टच्या बसेसमधून सर्वसामान्यांनादेखील प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. परंतु, लोकल सेवा अजून तरी केवळ अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचारी वर्गासाठी खुली ठेवण्यात आली आहे. लोकल प्रवास सर्वांसाठी खुला करायचा की नाही याबद्दलचा निर्णय एका आठवड्यानंतर घेतला जाईल. शहरातील कोविडच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर लोकल सेवेबद्दलचा अंतिम निर्णय होईल", अशी महत्त्वपूर्ण माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली.
"सध्या मुंबईतील मॉल्स, नाट्यगृहे, चित्रपटगृहे बंद असतील. बस सेवा सुरु असेल पण प्रवाशांना उभे राहून प्रवास करता येणार नाही. पाचव्या टप्प्यातून येणाऱ्या खासगी वाहनांना मुंबईत परवानगी नसेल. स्पा, सलून 4 वाजेपर्यंत सुरु राहतील पण, दुकानदारांना एसी बंद ठेवावा लागेल. कारण या माध्यमातून कोरोना पसरू शकतो. एसी सुरु ठेवल्याचं आढळल्यास कारवाई करण्यात येईल. हॉटेल, रेस्टॉरंट्स 50 टक्के क्षमतेसह 4 वाजेपर्यंस सुरु ठेवण्यास परवानगी आहे. 4 नंतर पार्सल सेवा सुरु ठेवता येईल. सर्वात महत्त्वाचं, अनलॉक करायचं तर लोकांनी स्वयंशिस्त पाळली पाहिजे. कोविडचं संकट अद्याप संपलेलं नाही. आपण त्याला संपवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे लोकांनी नियम पाळलेच पाहिजेत", असेही पेडणेकर यांनी स्पष्ट केले.