Vidhan Sabha 2019 : मुंबई पूर्व : शिवसेना-भाजपसमोर आव्हान अंतर्गत बंडाळीचे!

Mumbai-East
Mumbai-East

विधानसभा  2019 : शिवसेना-भाजपसमोर मुंबईच्या पूर्वेत इच्छुकांच्या भाऊगर्दीने पक्षांतर्गत बंडाळी शमवण्याची डोकेदुखी आहे; तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला जागा टिकवण्याला प्राधान्य द्यावे लागेल. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमच्या आव्हानाने विद्यमान आमदारांसमोर कडवी स्पर्धा उभी ठाकली आहे.

मुंबई पूर्वेत शिवसेना-भाजपसमोर विरोधकांपेक्षा अंतर्गत बंडाळी शमवण्याचे आव्हान अधिक आहे. युती झाली, तरीही कुलाबा मतदारसंघापासून मुलुंड, शिवाजीनगरपर्यंतच्या १६ मतदारसंघांत नाराजांना रोखताना नेत्यांची कसरत होणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीसमोर मात्र त्यांच्या ताब्यातील तीन मतदारसंघ टिकवण्याचे आव्हान आहे. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम मतांचे गणित चुकवणार, हे निश्‍चित आहे. शिवसेनेला केवळ अणुशक्ती नगरमध्ये राष्ट्रवादी आव्हान निर्माण करू शकते.

मुंबईतील राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष सचिन अहिर आणि काँग्रेसचे कालिदास कोळंबकर यांनी अनुक्रमे शिवसेना आणि भाजपची वाट धरल्याने दक्षिण-मध्य मुंबईतून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अस्तित्वच संपल्यासारखी परिस्थिती झाली आहे. केवळ मुंबादेवी या मुस्लिमबहुल मतदारसंघात काँग्रेस टिकाव धरून आहे; या मतदारसंघात काँग्रेसचे मागील विधानसभा निवडणुकीतील मताधिक्‍य अवघ्या नऊ हजारांचे होते. त्यामुळे पुन्हा विजय मिळवणे त्यांच्यासाठी आव्हानच आहे. 

भायखळा येथे मतविभाजनामुळे २०१४ मध्ये निवडून आलेले ‘एमआयएम’चे वारिस पठाण यांना यंदा पूर्ण ताकदीने लढावे लागणार आहे. या मतदारसंघातून अनेक वर्षांपासून भाजप निवडणूक रिंगणात उतरत होती; मात्र युती झाल्यास शिवसेना या मतदारसंघासाठी आग्रह करू शकते. अशातच सचिन अहिर यांचे इथे पुनर्वसन करण्याचा विचार शिवसेनेचा असला, तरी महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यासह शिवसेनेचे काही ज्येष्ठ नगरसेवक या मतदारसंघासाठी 
इच्छुक आहेत. 

शिवडी मतदारसंघांत शिवसेनेला आव्हान देणारा उमेदवारच कोणत्याही पक्षाकडे नाही. ‘मनसे’चे बाळा नांदगावकर यंदा पूर्व उपनगरातील विक्रोळी मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्‍यता आहे. तिथे शिवसेनेचे सुनील राऊत आमदार आहेत. सध्याच्या परिस्थितीत तरी त्यांच्यासमोर फारसे आव्हान नसले, तरी नांदगावकर काही प्रमाणात अडचणीचे ठरू शकतील. शीव-कोळीवाडा येथून काँग्रेस कॅ. तमिल सेल्वन आणि कुर्ला येथून शिवसेनेचे मंगेश कुडाळकर यांचा विजयाचा मार्ग सुकर मानला जात आहे. युती झाल्यास शिवसेना या मतदारसंघासाठी मागणी करू शकते. 

पूर्व उपनगरातील शिवसेनेचे आमदार प्रकाश फातर्फेकर यांच्याविरोधात काँग्रेसचे माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे लढत देणार आहेत; मात्र वंचित बहुजन आघाडीमुळे या मतदारसंघात काँग्रेसच्या मतांची गोळाबेरीज विस्कटण्याची शक्‍यता वर्तवली जाते. अणुशक्ती नगरमध्येही राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांना वंचित बहुजन आघाडीसह एमआयएमचे आव्हान पार करून शिवसेनेशी दोन हात करावे लागणार आहेत. शिवाजीनगरमध्ये एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीकडून समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांच्यासमोर कडवे आव्हान असेल. त्यामुळे एकूणच मतांच्या विभागणीमुळे शिवसेनेच्या विठ्ठल लोकरे यांना लाभ होऊ शकतो. लोकरे काही महिन्यांपूर्वीच ‘शिवबंधना’त अडकले आहेत. त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्‍चित 
मानली जाते.

विक्रोळीत रंगतदार लढत
भांडुपही शिवसेनेसाठी सुरक्षित मतदारसंघ आहे. विक्रोळीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार संजय दिना पाटील यांच्यासह धनंजय पिसाळ इच्छुक आहेत; मात्र पाटील यांना भांडुप आणि पिसाळ यांना विक्रोळीतून उमेदवारी मिळू शकते. तसेच ‘मनसे’चे नांदगावकरही विक्रोळीतून रिंगणात उतरण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मतदारसंघात चुरशीची लढत होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com