Vidhan Sabha 2019 : कल्याणमधील बंडाळीमुळे ‘मातोश्री’ चिंतित

Eknath-Shinde
Eknath-Shinde

विधानसभा 2019 : मुंबई - कल्याण-डोंबिवलीतील शिवसेना नगरसेवक आणि शेकडो पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने ‘मातोश्री’वर खळबळ उडाली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी काही दिवसच शिल्लक असल्याने ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना संबंधित प्रकरणात लक्ष घालून नाराजांना समजावण्याचे आदेश ‘मातोश्री’ने दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने तयारी केली असतानाच कल्याणची जागा भाजपला सोडल्यामुळे शिवसेना-भाजपमधील स्थानिक पातळीवरील संघर्ष शमण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे कल्याण-डोंबवली आणि उल्हासनगर महापालिकेतील २६ नगरसेवक आणि ३०० कार्यकर्त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामे सुपूर्त केले आहेत. या पार्श्‍वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेमधून नाराजीचा सूर समोर आला आहे. तिकीटवाटपावरून स्थानिक नेत्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे.

आज सकाळी २६ नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत. या नगरसेवकांनी राजीनामे दिल्याने शिवसेनेसह भाजपच्याही अडचणी वाढल्या आहेत.
स्थानिक नेता धनंजय बोडारे यांच्या समर्थनार्थ सर्वांनी राजीनामे दिले आहेत. विधानसभेची उमेदवारी शिवसेनेच्या नेत्याला मिळावी, अशी या कार्यकर्त्यांची इच्छा होती. मात्र, जागावाटपात ही जागा भाजपकडे गेली.

त्यामुळे बोडारे यांचे समर्थक चिडले आहेत. दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुटलेल्या जागांवरील शिवसेना इच्छुकांची माफी मागितली होती. मात्र, या माफीचा कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगरातील शिवसैनिकांवर काहीही फरक पडला नसल्याचे चित्र आहे.

कल्याण पूर्व मतदारसंघात शिवसेनेचे उल्हासनगर येथील नगरसेवक धनंजय बोडारे यांनी बंडखोरी केल्याने भाजपचे विद्यमान आमदार गणपत गायकवाड दुखावले गेले आहेत. बोडारे हे कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. पदाधिकारी राजीनाम्याचे पडसाद थेट ‘मातोश्री’वर उमटले आहेत. त्यामुळे या प्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांना ‘मातोश्री’वरून देण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com