पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल केंद्रात प्रतिनियुक्तीवर जाण्याची जोरदार चर्चा

अनिश पाटील
Friday, 6 November 2020

राज्याचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल केंद्रात प्रतिनियुक्तीवर जाण्याची जोरदार चर्चा

मुंबई : राज्याचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल केंद्रात प्रतिनियुक्तीवर जाण्याची जोरदार चर्चा रंगली असताना त्यानंतर राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये मोठ्याप्रमाणात खांदेपालट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यासाठी आता जोरदार रस्सीखेच सुरु झाली आहे.

भारतीय पोलिस सेवेतील 1985 च्या बॅचचे अधिकारी सुबोधकुमार जयस्वाल हे यापूर्वी रॉ मध्ये दिल्लीत होते. मात्र दत्ता पडसलगीकर यांचा पोलिस आयुक्तपदाचा  कार्यकाळ पुर्ण झाल्यानंतर फडणवीस सरकारने सुबोधकुमार जयस्वाल यांची मुंबई पोलिस आयुक्त म्हणुन नियुक्ती केली. तर त्यानंतर पडसलगीकर हे पोलिस सेवेतुन कायर्यमुक्त होताच, त्यांची राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. त्यातच 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने, शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येत महाविकास आघाडी बनवून राज्यात सरकार बनवले.  त्यानंतर फेब्रुवारी 2020 मध्ये दिल्लीतून जयस्वाल यांना केंद्रीय यंत्रणेवर प्रतिनियुक्तीबाबत हिरवा सिग्नल मिळाला होता. मात्र जयस्वाल यांनी त्यावेळी नकार दिला होता.

महत्त्वाची बातमी : शिक्षणमंत्र्यांची माघार, अखेर शाळांना 14 दिवसांची दिवाळी सुट्टी

मात्र कोरोना काळात राज्य सरकारने जीआर काढून 15 टक्के बदल्याना परवानगी दिली. मात्र जयस्वाल यांचे कोरोना काळात बदल्यांबाबत वेगळे मत होते. अशातच जयस्वाल यांनी केंद्रात जाण्यासाठी  पुन्हा राज्य सरकारकडे परवानगी मागितली, असल्याचे बोलले जात आहे. यावेळी बदल्यानंतर त्यांना केंद्रात पाठवण्यात येणार असल्याचे जोरदार चर्चा रंगल्या होत्या. त्यातच आता बदल्यानंतर राज्य सरकारने जयस्वाल यांना दिल्ली जाण्यास परवानगी दिली असल्याचे बोलले जात आहे.  

महत्त्वाची बातमी : राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी महाविकास आघाडीची यादी सुपूर्द; राज्यपालांच्या निर्णयाकडे लक्ष

पोलिस महासंचालक पदासाठी जोरदार रस्सीखेच

सुबोधकुमार जयस्वाल केंद्रात गेल्यास  त्यांच्या रिक्त होणाऱ्या जागेवर जोरदार रस्सीखेच सुरु झाली आहे. यामध्ये संजय पांडे, बिपीन बिहारी, हेमंत नगराळे, सुरेंद्र पांडे, कनकरत्म आणि रजनिश सेठ यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र यामध्ये  संजय पांडे, नगराळे आणि रजनिश सेठ यांची नावे आघाडीवर मानली जात आहेत.  संजय पांडे यांचे नाव या स्पर्धेत काहीसे आघाडीवर मानले जाते. या बदलानंतर राज्यात मोठ्याप्रमाणात खांदेपालट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. काही महत्त्वाच्या शहरांमधील पोलिस आयुक्त पदांवरही नवे अधिकारी येण्याची शक्यता आहे.

( संपादन - सुमित बागुल )

maharashtras DG subodhkumar jaiswal might move to delhi after taking permission of state government 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtras DG subodhkumar jaiswal might move to delhi after taking permission of state government