माळढोकचा एकमेव नर काही दिवसांपासून बेपत्ता

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

मुंबई - राज्यातील नामशेष होणाऱ्या माळढोकची संख्या वाढविण्यासाठी वन विभाग हालचाल करत असतानाच एकमेव नर काही दिवसांपासून बेपत्ता झाल्याची माहिती हाती आली आहे. त्यामुळे २० कोटी खर्च करून सुरू होणाऱ्या कृत्रिम प्रजननाचा प्रकल्प संकटात आला आहे. हा प्रकल्प राबवावा की परराज्यांतून अंडी आणून त्यातून पक्षी जन्माला घालावेत, असा पेच वन विभागापुढे निर्माण झाला आहे.

राज्यातील नानौज येथील माळढोक अभयारण्यात एक मादी आणि वर्धा येथे माळढोकची एक जोडी होती; मात्र या जोडीतील नर काही महिन्यांपासून बेपत्ता आहे. सुरवातीला हा नर मध्य प्रदेशात गेला असावा असा अंदाज होता; मात्र तेथेही तो आढळला नाही. त्यामुळे माळढोकचे कृत्रिम प्रजनन करावे, असा पर्याय पुढे आला आहे. मात्र यासाठी २० कोटींचा खर्च अपेक्षित असल्याने वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी याबाबत साशंक आहेत. त्यातच या प्रकल्पासाठी केंद्रीय वनविभागाचीही परवानगी आवश्‍यक असल्याने ती मिळवणे अवघड असल्याचे बोलले जात आहे. कृत्रिम प्रजननाऐवजी राजस्थान किंवा गुजरातमधून माळढोकची अंडी मिळवून राज्यातील माळढोकची संख्या वाढवण्याचा विचार पुन्हा होत आहे; मात्र यापूर्वीही अंडी मिळवण्याचे प्रयत्न वन विभागाने केले असता दोन्ही राज्यांनी अंडी देण्यास नकार दिला होता. त्यामुळे नव्या प्रयत्नांना किती यश येणार याबाबत संभ्रमच आहे.

कृत्रिम प्रजननाचा प्रकल्प राबविणे कठीण आहे. त्याऐवजी राजस्थान किंवा गुजरातमधून माळढोकची काही अंडी मिळतील का, याबाबत प्रयत्न केले जातील.
- एम. के. राव, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक, पश्‍चिम विभाग (वन्य जीव)

Web Title: maldhok bird missing