नवी मुंबईतील मॉलचे पुन्हा उघडले दार; अनलॉक 4 नुसार या अटीचे पालन करावे लागणार 

सुजित गायकवाड
Thursday, 3 September 2020

नवी मुंबई महापालिकेने अनलॉकनंतरही 30 सप्टेंबरपर्यंत 33 कन्टेन्मेट झोनमध्ये लॉकडाऊन लागू केले आहे. त्याचबरोबर आयुक्त अभिजीत बांगर यांनी "अनलॉक 4' ची नियमावलीदेखील प्रसिद्ध केली आहे. यानुसार कन्टेन्मेट झोन वगळता इतर भागात अनलॉकचे नियम लागू करण्यात आले आहेत.

नवी मुंबई : कोरोनामुळे बंद असलेल्या नवी मुंबईतील ठिकठिकाणच्या मॉलचे दार आज (ता. 2) पासून पुन्हा उघडले आहे. राज्यभरात "अनलॉक 4' सुरू झाले आहे. त्यानुसार नवीन नियमावली लागू करत महापालिकेने नागरिकांना खरेदीसाठी मॉलच्या रूपाने पर्याय खुला केला आहे. राज्यात अन्यत्र मॉल सुरू असताना नवी मुंबईत ते बंद होते. त्यामुळे मॉल व्यवस्थापनांनी नाराजी व्यक्त केली होती. यासंदर्भात "सकाळ'ने वृत्त प्रसिद्ध करून लक्ष वेधले होते. त्याची दखल घेत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मॉल खुले केले आहेत. 

हे वाचा : रियाचा द्वेष पाहून फार वाईट वाटतेय

नवी मुंबई महापालिकेने अनलॉकनंतरही 30 सप्टेंबरपर्यंत 33 कन्टेन्मेट झोनमध्ये लॉकडाऊन लागू केले आहे. त्याचबरोबर आयुक्त अभिजीत बांगर यांनी "अनलॉक 4' ची नियमावलीदेखील प्रसिद्ध केली आहे. यानुसार कन्टेन्मेट झोन वगळता इतर भागात अनलॉकचे नियम लागू करण्यात आले आहेत. मोठे आणि सार्वजनिक कार्यक्रमांना मनाई करण्यात आली आहे. सार्वजनिक जागेत पाचपेक्षा अधिक नागरिकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच या नव्या नियमावलीनुसार शहरातील मॉल पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. महापालिकेच्या या परवानगीचे मॉल व्यवस्थापनांकडून स्वागत केले असून नागरिकांची सॅनिटाईज, सोशल डिस्टिन्सिंगनुसार मॉलमध्ये प्रवेश देण्यात येत आहे; परंतु मॉलमधील सिनेमागृहे, बार आणि मनोरंजक बाबींवर बंदी घालण्यात आली आहे. 

हे वाचा : दहावी, बारावीच्या फेरपरीक्षा लांबणीवर

विविध कार्यक्रमांना बंदी कायम 
शहरात सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सास्कृतिक, धार्मिक आणि इतर मोठ्या समुदायास मनाई करण्यात आली आहे. शहरातील हॉटेल आणि लॉजिंग पूर्णपणे सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. 

आरोग्य सेतू अनिवार्य 
राज्य सरकारच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार मॉलमध्ये प्रवेश करण्याआधी सर्वांना केंद्र सरकारच्या आरोग्य सेतू ऍप स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड करणे अनिवार्य आहे. हा ऍप मोबाईलमध्ये आहे की नाही, याची शहानिशा करूनच नंतर मॉलमध्ये प्रवेश दिला जातो. जर प्रवेश करणाऱ्याच्या स्मार्टफोनमध्ये सेतू ऍप नसेल, तर त्याला तो डाऊनलोड केल्यानंतर आत प्रवेश दिला जातो. 

सवलतींची खैरात 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे गेले पाच महिने मॉल बंद राहिल्यामुळे मॉल व्यवस्थापनाची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. ही विस्कटलेली घडी बसवण्यासाठी मॉल्स व्यवस्थापनांकडून ग्राहकांवर सवलतींच्या खैरातींचा पाऊस पाडला आहे. सीवूड्‌स आणि वाशी येथील मॉल्समध्ये नामांकित कंपन्यांच्या दुकानांनी महागडे बूट, कपडे, गॉगल्स, महिलांचे कपडे, बॅग आदी वस्तूंवर तब्बल 50 ते 70 टक्‍क्‍यांपर्यंत सवलत जाहीर केली आहे. काहींनी तर जुना माल संपवण्यासाठी स्टॉक क्‍लिअरिंग सेलची घोषणा केली आहे. 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mall reopened in Navi Mumbai; Municipal unconditional permission after unlock 4