esakal | फेरीवाला ताबा पावतीत गैरव्यवहार; केवळ २० टक्केच उत्पन्न तिजोरीत
sakal

बोलून बातमी शोधा

Thane Municipal corporation

फेरीवाला ताबा पावतीत गैरव्यवहार; केवळ २० टक्केच उत्पन्न तिजोरीत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : ठाणे पालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर काही फेरीवाल्यांना गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे उघडकीस आले आहे. त्याच वेळी पालिका प्रशासन फेरीवाल्यांकडून वसूल करीत असलेल्या ताबा पावतीत कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याची माहिती सर्वसाधारण सभेत देण्यात आली. महापौर नरेश म्हस्के यांनी ताबा पावत्यांमधील गैरव्यवहार उघडकीस आणीत गेल्या तीन वर्षांची ताबा पावती उत्पन्नाची आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार ताबा पावतीतून पालिकेला मिळणारे प्रत्यक्ष उत्पन्न आणि फेरीवाल्यांची संख्या यात मोठी तफावत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे ताबा पावतीच्या माध्यमातून केवळ २० टक्केच उत्पन्न पालिकेच्या तिजोरीत जमा होत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली.

पालिकेची सर्वसाधारण सभा सोमवारी पार पडली. सभेच्या सुरुवातीला सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावरील हल्ल्यावरून चर्चेला सुरुवात केली. या वेळी सभेत तब्बल आठ ते दहा तास चर्चा करण्यात आली. यावेळी शिवसेनेच्या नगरसेविका परीषा सरनाईक यांनी फेरीवाल्यांची हिरानंदानी मेडोजमध्ये घरे असल्याची माहिती उघड केली. काही फेरीवाल्यांची कमाईही मोठी असल्याचे सरनाईक म्हणल्या.

या वेळी महापौरांनी फेरीवाल्यांच्या ताबा पावतीत कोट्यवधींचा घोटाळा होत असल्याचे म्हटले. या वेळी त्यांनी सभागृहात आकडेवारी जाहीर केली. त्यामुळे संपूर्ण सभागृहच अवाक् झाले. २०१९-२० मध्ये ताबा पावतीच्या माध्यमातून १ कोटी ४४ लाख ९१ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. महिन्याला हे उत्पन्न १२ लाख ७ हजार पर्यंत जात असून उत्पन्नाच्या या आकडेवरून दिवसाला २०१२ फेरीवाल्यांची संख्या नमूद आहे. यंदाच्या वर्षात ९ प्रभाग समितीत केवळ २,०१२ फेरीवाल्यांची संख्या कशी काय असू शकेल, असा सवाल महापौरांनी उपस्थित केला. २०२०-२१ मधील ताबा पावतीच्या माध्यमातून वार्षिक ५१ लाख ६४ हजार उत्पन्न मिळाले आहे. महिन्याकाठी हे उत्पन्न ४ लाख ३० हजार इतके येत आहे. या उत्पन्नानुसार दिवसाला फेरीवाल्यांची संख्या ७१७ येत आहे. उत्पन्न आणि फेरीवाल्यांची संख्या यात मोठी तफावत असल्याचे ते म्हणाले. २०२०-२१ मधील गेल्या पाच महिन्यांत ताबा पावतींच्या माध्यमातून ४१ लाख ३० हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. महिन्याकाठीचे उत्पन्न ८ लाख २६ हजार इतके येत आहे. दिवसाला ४१ हजार ३०६ हे दिवसाला उत्पन्न येत असून फेरीवाल्यांची १,३७६ च्या घरात येत असून पाच महिन्यांतील ही मोठी तफावत म्हस्के यांनी उघड केले.

मुंब्र्यात तीन कोटींचे उत्पन्न

मुंब्रा प्रभाग समितीच्या हद्दीतील ५ हजार फेरीवालयांच्या माध्यमातून ३ कोटींचे उत्पन्न जमा झाले आहे. जर एकट्या मुंब्रा प्रभाग समितीमधून ३ कोटींचे उत्पन्न जमा होत असेल तर,संपूर्ण ठाणे शहरात सर्व प्रभाग समिती मिळून १ कोटी ४४ लाखांचे उत्पन्न कसे येऊ शकते असा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे.

तीन वर्षांतील आकडेवारी

२०१९ – २० – १ कोटी ४४ लाख ९१ हजार २७५ – महिना १२ लाख

२०२० – २१ – ५१ लाख ६४ हजार २३२ – महिन्याला ४.५० लाख

एप्रिल ते ऑगस्ट २०२१ – ४१ लाख ३० हजार ६५५ – महिन्याला – ८ लाख २६ हजार

loading image
go to top