
अश्लील फोटोद्वारे ६०० हून अधिक महिलांना ब्लॅकमेल करणाऱ्या नराधमाला अटक
अल्पवयीन मुली आणि महिलांना मोबाईलवरुन अश्लील क्लिप पाठवणाऱ्या एका विकृताला पोलिसांनी अटक केली आहे. आत्तापर्यंत त्याने ६०० हून अधिक महिलांना त्रास दिल्याचं समोर आलं आहे. तर त्यांचे फोनही हॅक केल्याचं समोर आलं आहे.
मुंबईतल्या धारावी परिसरात आरोपी राहणारा आरोपी रवी दांडू डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून एका कंपनीत काम करतो. त्याला महिलांविषयी वाटणाऱ्या आकर्षणामुळे तो सोशल मीडियावर सुंदर मुलींचे फोटो तपासायचा. त्यांचे फोटो डाऊनलोड करुन, मॉर्फ करुन अश्लील फोटो तयार करायचा. त्याद्वारे तो या महिलांकडे शरीरसुखाची मागणी करायचा. काही मुलींचे फोन हॅक करुन त्यांची बदनामी करायचा.
आत्तापर्यंत आरोपीने ६०० हून अधिक महिलांना ब्लॅकमेल केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. नुकतंच रवीने ब्लॅकमेलिंगची पद्धत बदलली होती. विद्यार्थिनींजवळ तो सांगायचा की आपणही विद्यार्थी आहे आणि अभ्यासाच्या सामग्रीची देवाणघेवाण करण्याच्या बहाण्याने व्हॉटसप गृपला अॅड व्हायला सांगायचा. त्यासाठी तो एक लिंकबनवून मुलींना पाठवायचा ही लिंक ओपन केल्यानंतर त्यावर येणारा ओटीपी शेअर करायला सांगून तो मिळताच मुलीच्या संपूर्ण मोबाइलचा ताबा तो स्वत:जवळ ठेवायचा.
सायन इथल्या मुलीला त्याने अशा प्रकारे ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. तिचे मॉर्फ केलेले फोटो आणि व्हिडीओ तिच्या ३५ मित्र मैत्रिणींना पाठवून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. मात्र ही बाब मुलीने घरातल्यांना सांगितल्यानंतर घरच्यांनी पोलिसात धाव घेतली. त्यानुसार अंधेरी पोलिसांनी रवी दांडूवर गुन्हा दाखल करत, त्याला अटक केली.