
मुंबई-गोवा महामार्गावर देशाच्या विविध भागातील पर्यटकांची वर्दळ सुरू असते. त्यामुळे महामार्ग हे हापूस आंबा विक्रीचे मोठे माध्यम बनलेले आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजापूर, लांजा, पाली, हातखंबा, चिपळूण, खेड आदी भागात महामार्गावर अनेक शेतकरी, बागायतदार छोटे-छोटे स्टॉल उभारून आंबा विक्री करतात. या ठिकाणी दरवर्षी लाखो रूपयांची उलाढाल होते. सध्या महामार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्यामुळे या स्टॉलधारकांची पंचाईत झाली असली तरीही पर्यायी व्यवस्था त्या स्टॉलधारकांनी केली आहे. रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर दाभोळ येथे सुमारे ६० स्टॉलधारक आंबा विक्री करतात. दिवसाला यामधून काही लाखांची उलाढाल होते. यामुळे वाहतूक, दलाली याची बचत होते तसेच थेट विक्रीमुळे दरही अधिक मिळतो आणि पैसेही रोखीत मिळतात; मात्र ही व्यवस्था छोट्या बागायतदारांना पूरक ठरते. मोठे बागायतदार या पद्धतीने व्यवस्थापन करू शकत नाहीत.