कोकणातून आंबा वाहतूक रोडावली, काय आहेत कारणे? वाचा सविस्तर

दीपक शेलार
रविवार, 3 मे 2020

कोरोनासारख्या महामारीच्या साथीमध्येही कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना "आंबा आपल्या दारी" या चळवळीने उभारी मिळून मदतीचा हात लाभला होता. मात्र, आता मोठमोठ्या शहरांचा समावेश रेड झोनमध्ये झाल्याने या क्षेत्रात आंबा वाहतूक करणाऱ्यांनाच कोकणात क्वारंटाईन केले जात असल्याने आंबा वाहतूक रोडावली आहे. कोकणातील जिल्हा प्रशासनाच्या ग्रामधोरणामुळे या चळवळीलाच खीळ बसण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे सरकारने कोकणातील आंबा वाहतूकदारांसाठी काही सवलतीसह नियम शिथिल करावेत, अशी मागणी आंबा उत्पादकांकडून केली जात आहे.

ठाणे : कोरोनासारख्या महामारीच्या साथीमध्येही कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना "आंबा आपल्या दारी" या चळवळीने उभारी मिळून मदतीचा हात लाभला होता. मात्र, आता मोठमोठ्या शहरांचा समावेश रेड झोनमध्ये झाल्याने या क्षेत्रात आंबा वाहतूक करणाऱ्यांनाच कोकणात क्वारंटाईन केले जात असल्याने आंबा वाहतूक रोडावली आहे. कोकणातील जिल्हा प्रशासनाच्या ग्रामधोरणामुळे या चळवळीलाच खीळ बसण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे सरकारने कोकणातील आंबा वाहतूकदारांसाठी काही सवलतीसह नियम शिथिल करावेत, अशी मागणी आंबा उत्पादकांकडून केली जात आहे.

क्लिक करा : ठाणेकरांच्या मदतीने मजुरांच्या स्थलांतरणाचा मार्ग सुकर 

कोरोना संकटामुळे चिंताग्रस्त बनलेल्या कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी ठाण्याचे आमदार संजय केळकर आणि ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनचे सीताराम राणे यांनी गृहनिर्माण संस्थाना सोबत घेत "आंबा आपल्या दारी" चळवळ सुरू केली. त्यामुळे, लॉकडाऊन काळातही कोकणातील हापूस ठाणेकरांना थेट दारी मिळण्यासह आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठीही विक्रीचा उत्तम पर्याय उपलब्ध झाला होता. 

काही दिवसांत सुमारे 7 हजार पेट्या वितरीत करून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यात आले. मात्र, मुंबई, पुणे आणि ठाणे या क्षेत्राचा समावेश रेड झोनमध्ये झाल्याने या क्षेत्रात आंबा वाहतूक करून परतणाऱ्यांना आता कोकणात क्वारंटाईन केले जात आहे. त्यामुळे, मुंबई-ठाण्यासह पुण्यात आंबा वाहतूक करण्यासाठी कुणीही वाहनचालक अथवा कामगार धजावत नसल्याने आंबा उत्पादक धास्तावले आहेत. 

वाचा सविस्तर : खवय्यांच्या ताटलीतून सुकी मासळी गायब

उपाय कोकणच्या राजाच्या मुळावर 
राज्यात कोरोनाचे थैमान सुरू असले, तरी सिंधुदुर्ग जिल्हा अद्याप ग्रीन झोनमध्ये आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे आणि वेळोवेळी घोषित केल्या जाणाऱ्या हॉटस्पॉट क्षेत्रातून कोकणात येणाऱ्यांना 14 दिवस क्वारंटाईन आणि त्यानंतर 14 दिवस होम क्वारंटाईन ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. यासाठी ग्रामस्तरावर तसेच, नगरपंचायत क्षेत्रात प्रभाग, वॉर्डस्तरीय नियंत्रण समिती स्थापन केली आहे. त्यानुसार, रेड झोनमधून येणाऱ्यांना क्वारंटाईन केले जात असल्याने आंबा वाहतूकदारांसमोर समस्या निर्माण झाली आहे. 

कोकणातल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना एकत्र करून जिल्हास्तरीय हौसिंग संस्थाच्या माध्यमातून लॉकडाऊन काळातही आंब्याचे वितरण सुरू केले होते. दलालांचे उच्चाटन करून थेट विक्रीमुळे ऐन हंगामात कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यासाठी मोलाची मदत मिळाली होती. परंतु, आता या चळवळीलाच खीळ बसण्याची चिन्हे असून कोकणातील शेतकऱ्यांचीही अवस्था बिकट होईल.
- सीताराम राणे, अध्यक्ष, 
ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mango transport from Konkan was disrupted