ठाणेकरांच्या मदतीने मजुरांच्या स्थलांतरणाचा मार्ग सुकर 

ठाणेकरांच्या मदतीने मजुरांच्या स्थलांतरणाचा मार्ग सुकर 

ठाणे : लॉकडाऊनमुळे राज्यात अडकून पडलेल्या लाखो परप्रांतीय मजूर व कामगारांना मूळगावी परतण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने विहीत नमुन्यात ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन केले. मात्र, या नागरिकांना ऑनलाईनचा 'अ' देखील ठाऊक नसल्याने अनेकांची अडचण झाली. ही बाब हेरून काही समाजसेवक तसेच, सुहृदयी ठाणेकर नागरिक मदतीसाठी सरसावले आहेत. त्यानुसार, अर्ज भरण्यासह डॉक्टरांच्या मदतीने मोफत वैद्यकीय तपासणी करून प्रमाणपत्र देण्याची सुविधा देखील उपलब्ध करण्यात आल्याने मजुरांच्या स्थलांतरणाचा मार्ग सुकर बनला आहे.

ठाणे जिल्ह्यातून परराज्यामध्ये वा जिल्ह्यामध्ये जाणारे कामगार, पर्यटक, भाविक, विद्यार्थी व इतर व्यक्तींना सरकारने नमूद केल्याप्रमाणे पोलिसांच्या संबंधित संकेतस्थळावर ऑनलाईन माहिती सादर करावी लागत आहे.

स्थलांतर करणाऱ्या इच्छुकांनी नोंदणीकृत अधिकाऱ्याकडून विषाणूची लक्षणे नसल्याबाबातचे प्रमाणपत्र सदर अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. अपवादात्मक स्थितीत गटप्रमुख नेमून ऑफलाईन अर्ज करण्याची मुभाही देण्यात आली असली, तरी अनेक मजूर आणि कामगारांकडे ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करण्याचे ज्ञान अथवा साधनेही नसल्याने अडचण झाली आहे. 

अनेक ठिकाणी तर मजुरांचे तांडेच्या तांडे थेट पोलिस ठाण्यात पोहोचू लागल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होत आहे. त्यामुळे मूळगावी प्रवास करू इच्छिणाऱ्या नागरिकांना अर्ज भरणे, वैद्यकीय प्रमाणपत्र देणारे डॉक्टर यांची व्यवस्था करण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल मांगले, पोलिस निरिक्षक रवींद्र क्षीरसागर यांच्या देखरेखीखाली भूमकर रुग्णालयाचे डॉ. हितेश छाडवा, विकसक जतीन शाह यांच्यासारख्या अनेक सुहृदयी ठाणेकर पुढे आले आहेत. 

मोफत तपासणी सुविधा
डॉ. हितेश छाडवा आणि जतीन शाह यांनी शनिवारी सायंकाळपासून पाचपाखाडी आणि चंदनवाडी येथे तब्बल 125 कामगारांची मोफत तपासणी करून प्रमाणपत्र दिले आहे. ठाण्यातील भाजप उपाध्यक्ष डॉ. राजेश मढवी आणि नौपाड्यातील नगरसेविका प्रतिभा मढवी यांच्यातर्फे घंटाळी येथील जनसंपर्क कार्यालयात अर्ज भरण्यासह वैद्यकीय तपासणीची मोफत सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com