मांजरी रेल्वे स्थानकातील अपघातांबाबत खुलासा करा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

मुंबई - पुणे जिल्ह्यातील मांजरी बुद्रुक रेल्वेस्थानकावरील फलाटांच्या कमी उंचीमुळे झालेल्या अपघातांबाबत खुलासा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे मंत्रालयाला दिले आहेत. दौंड येथील रहिवासी नारायण डोळे यांनी केलेल्या जनहित याचिकेवर मंगळवारी मुख्य न्यायाधीश नरेश पाटील आणि न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

मांजरी परिसरात आठ महाविद्यालये असल्याने विद्यार्थ्यांची नेहमीच वर्दळ असते. या रेल्वेस्थानकात दिवसभरात सुमारे 20 गाड्या थांबतात. येथील दोन्ही फलाटांची उंची अत्यंत कमी आहे. त्यामुळे हे फलाट प्रवाशांसाठी धोकादायक ठरले आहेत.

याचिकादारांची मुलगी पूजा डोळे ही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये एम.एस्सी. करत होती. मागील वर्षी जुलैमध्ये दुपारच्या सुमारास पूजा फलाटावरून गाडीत चढताना पडली. त्या वेळी गंभीर जखमी झालेल्या पूजाला तातडीने लोणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तिचे वडील नारायण डोळे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली.

या स्थानकात होणाऱ्या अपघातांची संख्या वाढली आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने तातडीने दखल घेऊन फलाटाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. या संदर्भात रेल्वेने खुलासा करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले.

Web Title: Manjari Railway Station Accident clarification High Court