मनोहर जोशी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन ; अनेक दिग्गज आज एकाच व्यासपीठावर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 मार्च 2018

गुढीपाडव्याचे औचित्य साधत रविवारी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या "अवघे पाऊणशे वयोमान' या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

मुंबई : गुढीपाडव्याचे औचित्य साधत रविवारी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या "अवघे पाऊणशे वयोमान' या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. दादर येथील शिवाजी मंदिरमध्ये सायंकाळी 4 वाजता होणाऱ्या या सोहळ्यास माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. 

हे दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर येणार असल्याने तेथे राजकीय किस्से आणि टपल्या-टिचक्‍यांचा कार्यक्रम रंगणार हे निश्‍चितच आहे. काही वर्षांत जोशी यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात धाडसी विधाने केली आहेत. सध्या शिवसेना-भाजपचे संबंध चांगले नाहीत. त्यामुळे गडकरी आणि ठाकरे यांच्या उपस्थितीत जोशी कोणाचे कान टोचणार आणि कोणाला चिमटे काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्रिपुराचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, मुंबईचे महापौर विश्‍वानाथ महाडेश्‍वर हेही या वेळी उपस्थित राहणार आहेत. 

राज यांच्या सभेकडे सर्वांचे लक्ष 

शिवाजी मंदिरमध्ये हा सोहळा रंगणार असतानाच तेथून हाकेच्या अंतरावर असलेल्या शिवाजी पार्कवर सायंकाळी 5 वाजता मनसेचा गुढीपाडवा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ते या वेळी शिवसेनेसह भाजपलाही लक्ष्य करण्याची शक्‍यता आहे. ते या मेळाव्याद्वारे पक्ष कार्यकर्त्यांना कोणता कार्यक्रम देणार, हे पाहणेही औत्सुक्‍याचे असेल. 

Web Title: Manohar Joshi Book Publishing Pawar gadkari will attend ceremony