'डीडीएलजे'च्या रौप्यमहोत्सवानिमित्त प्रेक्षकांची मराठा मंदिरकडे धाव; चित्रपटगृह बंद असल्याने हिरमोड

दिनेश चिलप मराठे
Tuesday, 20 October 2020

चित्रपटाचा रौप्य महोत्सव साजरा करण्यासाठी प्रेक्षकांनी मुंबई सेंट्रल येथील मराठा मंदिर चित्रपटगृहाकडे धाव घेतली; मात्र चित्रपटगृह बंद असल्याने त्यांचा हिरमोड झाला. 

मुंबादेवी ः "दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' अर्थातच "डीडीएलजे' या चित्रपटाला आज 25 वर्षे पूर्ण झाली. 90 च्या दशकातील या सुपरहीट चित्रपटाने महाविद्यालयीन तरुण-तरुणींपासून आबालवृध्दापर्यंत सर्वांवर भुरळ घातली होती. या चित्रपटाचा रौप्य महोत्सव साजरा करण्यासाठी प्रेक्षकांनी मुंबई सेंट्रल येथील मराठा मंदिर चित्रपटगृहाकडे धाव घेतली; मात्र चित्रपटगृह बंद असल्याने त्यांचा हिरमोड झाला. 

दाऊदचा विश्वासू इकबाल मिर्चीच्या कुटुंबियांच्या मालमत्तेवर टाच; ईडीची कारवाई

बॉलिवूडमध्ये इतिहास रचणारा "डीडीएलजे' हा चित्रपट 20 ऑक्‍टोबर 1995 ला मराठा मंदिरसह सर्वत्र प्रदर्शित झाला. शाहरुख खान, काजोल, अनुपम खेर, अमरीश पुरी, फरीदा जलाल, मंदिरा बेदी यांच्या सदाबहार अभिनयाने या चित्रपटाने सर्वांच्याच मनावर अक्षरशः गारुड घातले. अभिनयासह उत्तम कथा, सहजसोपे संवाद आणि चित्रपटातील गाणी आजही रसिकांच्या मनात घर करून आहे. मराठा मंदिर चित्रपटगृहात तर गेल्या 25 वर्षांपासून हा चित्रपट सुरू आहे. लॉकडाऊनपूर्वी या चित्रपटाच्या मॅटिनी शोला नवीन प्रेक्षक येत होते. या थिएटरच्या आजबाजूला असलेल्या अनेक दुकानदारांनी जुन्या आठवणी जागवल्या. या चित्रपटासाठी प्रेक्षक ब्लॅकने तिकीट खरेदी करत असत. शुक्रवार, शनिवार आणि रविवारी तर हाऊसफुलचा बोर्ड लावलेलाच मिळायचा. या चित्रपटामुळे आमचाही व्यवसाय चांगला होत असल्याचे ते सांगतात. 

मोठा दिलासा ! उद्यापासून सर्व महिलांना लोकल प्रवासाची मुभा, रेल्वेची परवानगी मिळाली

लॉकडाऊनमुळे सध्या चित्रपटगृह बंद आहे; मात्र "डीडीएलजे'च्या रौप्यमहोत्सवानिमित्त अनेक प्रेक्षकांनी आज चित्रपटगृहाकडे गर्दी केली होती. आपल्या आवडीच्या कलाकारांचे दर्शन होईल, अशी त्यांना अपेक्षा होती. मराठा मंदिरमध्ये "दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' हा चित्रपट 25 व्या वर्षात पदार्पण करतोय, त्याचा खूप आनंद आहे; मात्र लॉकडाऊनमुळे गेल्या सहा महिन्यांपासून चित्रपटगृह बंद असल्याने आम्ही या ऐतिहासिक क्षणाला मुकलो असल्याची प्रतिक्रिया मराठा मंदिर चित्रपटगृहाचे व्यवस्थापक मनोज पांडे यांनी दिली. 

दाभोलकर हत्या प्रकरण! घटनेत वापरलेल्या कथित हत्याराचा बॅलेस्टीक अहवाल अद्यापही प्रलंबित

आज रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करताना हा चित्रपट आम्हाला मराठा मंदिरमध्ये आवर्जून बघायचा होता, परंतु चित्रपटगृह बंद असल्याने आमची निराशा झाली. परंतु आज आम्ही सहकुटुंब घही ऑनलाईन चित्रपट पाहणार आहोत. 
- विनोद वास्कर, अकाउंटंट. 
---- 
खरंतर माझ्यासाठी हा चित्रपट फारच हृदयस्पर्शी आहे. महाविद्यालयात असताना मराठा मंदिरमध्ये मी माझ्या मैत्रिणीसोबत मॅटिनी शो पाहिला. पुढे आमचे प्रेम बहरले आणि लग्नही झाले. आज हा चित्रपट मराठा मंदिरमध्ये बघायचा होता, पण ते शक्‍य झाले नाही. 
- आनंद साळुंखे, प्रेक्षक. 
..... 
आज पत्नी आणि मुलांसह हा चित्रपट बघायचा होता. चित्रपटगृह बंद असल्याने खंत वाटते. अत्यंत सुंदर लोकेशन्स, सुमधूर गाणी, काजोल, शाहरुख आणि अमरीश पुरी यांचा अभिनय पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहायची इच्छा अपूर्ण राहिली. 
- प्रमोद गायकवाड, संगीता गायकवाड, प्रेक्षक

संपादन ः ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: many people came to maratha mandir amid 25 years of dilwale dulhaniya le jayenge