दादरमध्ये झाडांची अवकाळी पानगळ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 मे 2019

दादर पश्‍चिम शिवाजी पार्कजवळील अनेक झाडांची अवकाळी पानगळ सुरू झाली आहे. दादासाहेब रेगे मार्ग, गोखले मार्गावरील अशोकासारख्या हिरव्यागार झाडांची पाने अचानक वाळून गळू लागली आहेत.

मुंबई - दादर पश्‍चिम शिवाजी पार्कजवळील अनेक झाडांची अवकाळी पानगळ सुरू झाली आहे. दादासाहेब रेगे मार्ग, गोखले मार्गावरील अशोकासारख्या हिरव्यागार झाडांची पाने अचानक वाळून गळू लागली आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना चिता वाटू लागली आहे. पालिकेकडे आलेल्या तक्रारींनंतर आता संबंधित झाडे वाचवण्यासाठी उद्यान विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत.

शिवाजी पार्क परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर अशोक, गुलमोहोर, पिंपळ, कडुनिंब अशी अनेक जुनी मोठी झाडे आहेत. शिवाजी परिसरात फेरफटका मारण्यास येणाऱ्या रहिवाशांना या झाडांमुळे सावली मिळते. मात्र, काही दिवसांपासून दादासाहेब रेगे मार्गावरील अशोकाच्या झाडांची पाने अचानक सुकून गळून पडत आहेत. झाडांच्या फांद्याही सुकू लागल्या आहेत. विशेष म्हणजे वसंत ऋतूमध्ये या झाडांना नवी पालवी फुटणे अपेक्षित असताना ही झाडे सुकू लागल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

दादर-शिवाजी पार्क परिसरात सध्या ‘मेट्रो’साठी मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू आहे. खोदकाम आदी कामांतील सांडपाणी वगैरे परिसरात सोडले जाते. अनेक दिवस झाडांच्या मुळांजवळ साचून राहिलेले पाणी आणि मुळांपाशी वाढलेली दलदल यांचा दुष्परिणाम झाडांवर होत असल्याचे रहिवाशांचे  म्हणणे आहे. ‘मेट्रो’च्या कामांतील गाळमिश्रित पाणी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर सोडले जात असते. त्यामुळे अनेक वेळा रस्त्याने चालणेही मुश्‍कील होत असल्याच्या रहिवाशांच्या तक्रारी आहेत. पर्यावरणप्रेमींकडूनही येथील झाडांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. 

झाडांभोवती काँक्रीटीकरण झाले आहे. त्यामुळे त्यांना पाणी मिळत नाही. हरित लवादाने झाडाभोवती किमान दीड मीटर किंवा त्यापेक्षा जास्त जमीन ठेवावी; झाडाभोवती काँक्रीटीकरण करू नये, असे आदेश दिले आहेत. मात्र, त्याचे पालन होत नसल्याने झाडांना पाणी मिळत नाही. त्यामुळे झाडे मरू शकतात. 
-स्टॅलिम डी, पर्यावरण तज्ज्ञ

शिवाजी पार्क परिसरातील झाडांची पाहणी केल्यावर अनेक झाडांची पाने सुकून गळत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्‍वभूमीवर झाडांच्या मुळाजवळ स्वच्छता करणे, माती बदलून नवी माती देणे, शेणखत देणे अशा उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.  
-ए. जी. खैरनार, सहायक पालिका आयुक्त


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Many trees near Dadar West Shivaji Park have been started Leaf