माओवाद्यांची साहित्यातून चिथावणी

माओवाद्यांची साहित्यातून चिथावणी

मुंबई - 'भारतात निवडून आलेल्या मोदी सरकारच्या निर्णयांमुळे विकासाच्या नावाखाली अनेक लोकांना विस्थापित व्हावे लागणार आहे, आर्थिक विषमतेमुळे कोट्यवधींचे रोजगार जाणार आहेत , बेरोजगारी ही मोठी समस्या ठरणार आहे. या अस्वस्थतेतून आंदोलन उभारून व्यवस्थेला हादरा देण्यासाठी सर्व स्तरांत समर्थक पसरवा आणि त्यांना सक्रिय करा,'' असा आदेश माओवादी चळवळीचे सरचिटणीस गणपती यांनी दिला आहे.

गणपती हे माओवाद्यांचे भारतातील सर्वोच्च नेते आहेत. चार वर्षांपासून या आदेशांची अंमलबजावणी भारतात माओवादी करत असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित "एनडीए' सरकार विरोधात विविध समाज घटकांत कारवाईची राळ उडवून द्यायला हवी, अशी आदेशवजा मांडणी गणपती यांनी केली आहे.

या मांडणीनुसार शेतकरी, कामगार, शासकीय कर्मचारी, महिला, विद्यार्थी आणि युवकांत असंतोष पसरवणारे कार्यक्रम समाजातील महत्त्वाच्या व्यक्‍तींच्या मदतीने सुरू करण्याचेही निश्‍चित झाले आहे.

"लेसन्स ऍण्ड चॅलेंन्जेस ऑफ द इंडियन रिव्होल्युशन 2014' या शीर्षकाचा निबंध या चळवळीचा मार्गदर्शक मानला जात असून त्यात विविध उठावांची, त्यासाठी खून व रक्‍तपात टाळून उत्तम आंदोलने सुरू करण्याची अपेक्षा व्यक्‍त करण्यात आली आहे. "नक्षलबारी' या पहिल्या टप्प्यातील उग्र आंदोलनात शेकडो जीव गेले. आंध्र प्रदेश, तेलंगणातही जीवितहानी झाली, क्रांतीसाठी मरण पत्करण्यात काहीही गैर नाही उलट सन्मानच आहे, असे स्पष्ट शब्दांत लिहितानाच नव्या टप्प्यात अधिक प्रभावी कसे व्हावे, याची सविस्तर टिप्पणी यात आहे.

सरकार उलथवणे ही प्राथमिकता
ग्रामीण भागात वाढणारा मध्यमवर्ग हा चळवळीसमोरचे आव्हान असून, या वर्गावर हुकूमत मिळवणे आवश्‍यक असल्याचेही नि:संदिग्ध शब्दांत सांगण्यात आले आहे. शेती करणाऱ्या भागात तसेच शहरी लोकवस्तीत आर्थिक विषमतेचे प्रचंड परिणाम दिसत आहेत. या परिणामांनी गांजलेल्या नागरिकांची मोट बांधणे ही काळाची गरज असल्याचेही गणपती यांनी नमूद केले आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार उलथवून टाकणे ही आपली सर्वोच्च प्राथमिकता असल्याचेही माओवादी साहित्यात स्पष्ट करण्यात आले आहे. "सकाळ'च्या हाती असलेल्या कागदपत्रांत 2014 ते 2024 चे नियोजन आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ब्राह्मणवादी हिंदू फॅसिझमला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रोत्साहन देत आहे. मोदी सरकार देशातील चळवळींना चिरडून टाकत आहे. जनवादी चळवळींना बळ देणाऱ्या कार्यकर्त्यांवर मोदी सरकार वरवंटा फिरवीत आहे. ही वेळ सर्व क्षेत्रातील पाठिराख्यांनी आवाज करण्याची आहे, अशी आवाहनवजा चिथावणीही देण्यात आली आहे.

माओवादाने जगाचे प्रश्‍न सोडवण्यासाठी लढा देणे सुरू ठेवले आहे. माओवादाचे समर्थन करणाऱ्या प्रत्येकाला एकत्र आणणे, त्यांना शक्‍ती पुरवणे तसेच लोकलढ्याचे वातावरण निर्माण करणाऱ्यांना ऊर्जा देणे हा प्राधान्यक्रम असेल असेही सर्व समर्थकांना कळवले आहे. या संदर्भाने लढे सुरू आहेत काय याचा अभ्यास पोलिस दल करीत असल्याचे एका बड्या अधिकाऱ्याने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com