
मुंबई : मध्य रेल्वेचे मुख्यालय व जागतिक वारसास्थळात समावेश असलेल्या सीएसएमटी स्थानकाला मराठा आरक्षण आंदोलनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. आंदोलनाचे केंद्रबिंदू ठरलेल्या या स्थानकावर दररोज जवळपास शेकडो आंदोलक मुक्काम करीत असल्यामुळे रेल्वे प्रशासनावर प्रचंड ताण येत असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. सोमवारी (ता. १) या स्थानकाचे संचालन सुरळीत ठेवणे, हे मध्य रेल्वेपुढचे सर्वात मोठे आव्हान ठरणार आहे. गर्दी व अस्वच्छतेमुळे स्थानकाचे नियोजन संपूर्णपणे ढासळल्याचे चित्र आहे.