#MarathaKrantiMorcha ठाण्यात कडकडीत बंद 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जुलै 2018

ठाणे - मराठा समाजाला आरक्षण देण्यासह इतर मागण्यांसाठी ठाण्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. 

बंदमुळे ठाण्यातील जनजीवन विस्कळित झाले. बंदमध्ये वाहने रस्त्यावर उतरविणाऱ्यांना तासन्‌तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले. दुपारनंतर बंदला हिंसक वळण लागले. त्याचा फटका नागरिकांसह विद्यार्थ्यांनाही बसला. मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी समाजकंटकांनी आंदोलनाला हिंसक वळण दिल्याचा दावा मराठा समाजाने केला.

ठाणे - मराठा समाजाला आरक्षण देण्यासह इतर मागण्यांसाठी ठाण्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. 

बंदमुळे ठाण्यातील जनजीवन विस्कळित झाले. बंदमध्ये वाहने रस्त्यावर उतरविणाऱ्यांना तासन्‌तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले. दुपारनंतर बंदला हिंसक वळण लागले. त्याचा फटका नागरिकांसह विद्यार्थ्यांनाही बसला. मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी समाजकंटकांनी आंदोलनाला हिंसक वळण दिल्याचा दावा मराठा समाजाने केला.

पालिका शाळांना सुटी  
मराठा समाजाने पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर ठाणे पालिका क्षेत्रातील दुपारच्या सत्रातील शाळांना प्रशासनाकडून सुटी जाहीर करण्यात आली, तर खासगी शाळांनी परिसरातील परिस्थितीचा अंदाज घेत शाळा सुरू अथवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. शहरातील काही शाळांनी पालकांशी संपर्क साधत मुलांना घरी घेऊन जाण्यास सांगितले. जिल्हा परिषदेच्या शाळा मात्र सुरळीत सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

शाळकरी मुले अडकली
बंदचा अंदाज न घेता अनेकांनी पाल्यांना शाळेत पाठविले होते. अशा वेळी बंदचा भडका उडाल्यानंतर अनेक शाळांमधून मुलांना घरी सोडण्यात आले. या शाळकरी मुलांना आपल्या बससह वाहतूक कोंडीत अडकावे लागले. त्यातही महामार्गावरून जाणाऱ्या शाळकरी मुलांना त्याचा फटका सर्वाधिक बसला. अशा वेळी मोर्चामधीलच काही जणांनी पुढे होऊन या शाळकरी मुलांच्या बसला अथवा रुग्णवाहिकांना वाट करून देण्यासाठी प्रयत्न केले.

एसटी-रिक्षाही बंद
एसटी आणि रिक्षाही शहरात धावत नसल्याने त्याचा फटका ठाण्यात कामानिमित्त येणाऱ्यांना बसला. रेल्वेस्थानकातून ठाण्यात येणाऱ्यांना पायपीट करावी लागली, तर काही जणांनी टांग्याचा पर्याय निवडला.

आंदोलकांनी थांबवल्या रिक्षा
ठाण्यात तीनहात नाका येथे सकाळी मराठा समाजातर्फे काकासाहेब शिंदे यांना आदरांजली अर्पण करून बंदला सुरुवात केली. सकाळपासूनच मराठा आंदोलनाचा जोर दिसून आला. आंदोलकांनी रिक्षा सेवा आणि एसटी, टीएमटीच्या बसना लक्ष्य केले. कोपरी पुलावर वाहने रोखल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आंदोलकांनी रिक्षाचालकांना दमबाजी केल्याने रिक्षा सेवा बंद पडून प्रवाशांचे हाल झाले.

ठाण्यात टीएमटी ठप्प
मराठा ठोक मोर्चा आंदोलनाने बुधवारी पुकारलेल्या बंदमध्ये ठाणे पूर्वेकडील डेपोमधून सकाळी सुरळीत सुरू असलेली ठाणे महापालिकेची टीएमटी सेवा दुपारी १ वाजता आंदोलकांच्या पवित्र्यामुळे बंद करावी लागली. त्याच दरम्यान ठाणे पश्‍चिमेकडील सॅटीस पुलावरील बस स्थानकातून तुरळक बस वाहतूक सुरू होती; मात्र दुपारी पावणेदोनच्या सुमारास आंदोलकांचा जथ्था टीएमटी बसचा पाठलाग करत आल्याने सॅटीसवरील वाहतूकही बंद करावी लागली.

Web Title: #MarathaKrantiMorcha band in thane