#MarathaKrantiMorcha मुंबईत धडक, रेल्वे रोखली, बसची तोडफोड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जुलै 2018

मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून आज सकाळी जोगेश्वरी रेल्वे स्थानक आणि ठाणे रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले. उल्हासनगरमधील रिक्षा चालक मालक संघाने सुद्धा पाठिंबा दर्शविल्यामुळे रिक्षा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

मुंबई - राज्यभरात मराठा क्रांती ठोक मोर्चाचा उद्रेक झाल्यानंतर आज (बुधवार) मुंबई, ठाण्यात आंदोलकांकडून उद्रेक पाहायला मिळत आहे. जोगेश्वरी, ठाणे येथे लोकल वाहतूक रोखण्यात आली, तर ठाण्यात बस फोडण्याची आणि टायर जाळण्याची घटना घडली आहे. मुंबईसह नवी मुंबई, रायगड, पालघर, सातारा जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे. 

मुंबई मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांची मंगळवारी दादर येथील शिवाजी मंदिरच्या राजर्षी शाहू सभागृहात बैठक झाली. यात सरकारच्या मराठाविरोधी धोरणांचा निषेध करून आंदोलनात बळी गेलेल्या काकासाहेब शिंदे यांना आदरांजली वाहण्यात आली. बंददरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, अशी दक्षता घेण्याचे आवाहनही समन्वयकांनी केले होते. मंगळवारी राज्यभरात कडकडीत बंद पाळण्यात आला. काही ठिकाणी बंदला हिंसक वळण लागले आहे. असेच काही मुंबई, ठाण्यात पाहायला मिळत आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून आज सकाळी जोगेश्वरी रेल्वे स्थानक आणि ठाणे रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले. उल्हासनगरमधील रिक्षा चालक मालक संघाने सुद्धा पाठिंबा दर्शविल्यामुळे रिक्षा बंद ठेवण्यात आल्या आहेत. उल्हासनगर रेल्वे स्टेशन बाहेर रिक्षा बंद असल्याने प्रवासी मोटार सायकल वर येताना दिसत आहेत. ठाण्यातील माजीवडा पुलावर टायर पेटवून निषेध करण्यात आला. ठाण्यातील गोखले रास्ता, मार्केट परिसर पूर्णपणे बंद आहे. नौपाडा परीसरात निषेध रॅली काढण्यात आली. ठाण्यातील वागळे इस्टेट येथे आंदोलकांनी सकाळी टीएमटीच्या बसची तोडफोड केली आहे. नालासोपारा भागात आंदोलकांनी वाहतूक रोखली. दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. पालघर शहरसह जिल्ह्यात बंदला प्रतिसाद मिळत आहे. भोईसरमध्ये बंद सुरळीत सुरू आहे.

आरक्षणाच्या मुद्द्यांवरून दादर शिवाजी मंदिर येथे मराठी आंदोलकानी ठिय्या आंदोलन केले. दोन वर्षे उलटून गेले तरी सरकारने मराठा आरक्षणाबाबत कोणतीच ठोस पावले उचलली नाही, म्हणून आंदोलन करीत असल्याचे मराठी क्रांति मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले कोणताही हिंसक मार्गाने न जाता शांततेत आंदोलन करण्यात आले. शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दादर परिसरातून काढण्यात आलेल्या मोर्चात हजारो मराठे कार्यकर्ते सहभागी झाले होते. तर, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दादर परिसरात पोलिसांचा मोठा फ़ौजफाटा तैनात करण्यात आला होता. मध्य रेल्वेच्या ठाणे व ट्रान्स हार्बरवर घणसोली स्थानकात रेल रोको करण्यात आला. 

Web Title: MarathaKrantiMorcha MumbaiBandh agitation in Mumbai