मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचे इंग्रजी सुधारले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

मुंबई - विद्यार्थ्यांच्या मनातील इंग्रजी भाषेबाबत असलेली भीती व न्यूनगंड दूर करण्यासाठी शीवमधील शीव शिक्षण संस्थेच्या डी. एस. हायस्कूलमध्ये तीन वर्षांपासून स्पोकन इंग्लिश प्रशिक्षण अभ्यासक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमामुळे मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांच्या मनातील इंग्रजीची भीती दूर झाली असून ते उत्तम इंग्रजीत संवाद साधू लागल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

डी. एस. हायस्कूलमध्ये धारावी, सायन, चुनाभट्टी या परिसरातील कष्टकरी वर्गातील विद्यार्थ्यांचे प्रमाण खूप मोठे आहे. शाळेने जून २०१६ पासून मराठी माध्यमाच्या पहिली ते दहावीमधील सर्व विद्यार्थ्यांसाठी स्पोकन इंग्लिश प्रशिक्षण अभ्यासक्रम राबवण्यास सुरुवात केली. या उपक्रमासाठी चार तज्ज्ञ प्रशिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.

इंग्रजीतून संवाद
शाळेत स्पोकन इंग्लिश उपक्रम सुरू केल्यानंतर अडीच-तीन वर्षांत विद्यार्थ्यांमध्ये झालेला नेमका फरक समजण्यासाठी नुकतीच शाळेत मूल्यांकन चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याचा शब्दसंग्रह, संभाषण, व्याकरण, वाचन आदींबाबतच्या इंग्रजी ज्ञानाची चाचणी घेण्यात आली. शाळेतील ६० टक्‍क्‍यांहून अधिक विद्यार्थी इंग्रजीत संवाद साधू शकतात, असे चाचणीतून स्पष्ट झाले.

‘स्पोकन इंग्लिश उपक्रम’ घेतल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्‍वासात सकारात्मक वाढ दिसून आली आहे. नववी व दहावीच्या काही विद्यार्थ्यांनी नुकत्याच पार पडलेल्या शिक्षक-पालक सभेत इंग्रजी नाटक सादर केले. इंग्रजीत भाषण केले आणि पीपीटीद्वारे अस्खलित इंग्रजीत सादरीकरणही केले.
- राजेंद्र प्रधान, अध्यक्ष, डी. एस. हायस्कूल

इंग्रजीची भीती कायम मनात होती; पण शाळेत ‘स्पोकन इंग्लिश’चे नियमित वर्ग होऊ लागल्यावर त्या भाषेच्या गमतीजमती कळू लागल्या. प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे इंग्रजीची भीती वाटेनाशी झाली. 
- अभय महाडिक, नववीतील विद्यार्थी, डी. एस. हायस्कूल

Web Title: Marathi Medium Student English