महिलांच्या व्यक्ती स्वांतत्र्याचा आदर करा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 मार्च 2018

जागतिक महिला दिन साजरा करताना महिलांसमोर असलेल्या विविध आव्हानांकडे डोळझाक करून चालणार नाही. कारण आज जरी महिला प्रत्येक क्षेत्रात स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करत असल्या तरी त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर असलेली बंधने कोणीही नाकारू शकत नाही. याबाबतच भाष्य करणार्या या काही निवडक प्रतिक्रिया.

सध्याच्या युगात वावरणारी महिला एक शक्तिकेंद्र आहे. प्रत्येक महिलेत दुर्गा, काली, सरस्वती, लक्ष्मी विराजते. फक्त महिलांनी आपल्यातील कर्तृत्व ओळखून स्वतःला सिद्ध केले पाहिजे. आपल्यातील सुप्त गुण ओळखून आपल्या आवडत्या क्षेत्रात स्वतःला झोकून द्या. मग यश तुमचे आणि फक्त तुमचेच आहे. सध्या स्त्री पुरुषांच्या बरोबरीने नाही तर पुरुषांच्याही दोन पावले पुढे गेली आहे.
- मंदा म्हात्रे, आमदार, बेलापूर मतदारसंघ

सध्याच्या युगात महिला नोकरी किंवा उच्चभू पदी काम करताना घर सांभाळण्याची मोठी जबाबदारीदेखील त्या यशस्वीपणे पार पडतात. या महिलांना पुढे जाण्यासाठी घरातील व्यक्तींचे सहकार्य असणे गरजेचे असते. माझ्याकडे राजकारणाचे बाळकडू आहे आणि घरातील सर्वच व्यक्तींचे  सहकार्य असल्याने मी आज या क्षेत्रात आहे.
 - शुभांगी पाटील, सभापती, स्थायी समिती.

स्त्री म्हटले, की चूल आणि मूल अशी संस्कृती समाजात रुजली होती, परंतु आजची स्त्री ही शिक्षित असल्याने पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहे. शिक्षणामुळे स्त्रीला कायद्यांचे ज्ञान आले असून तिच्यावर होणारा कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन करू शकत नाही. 
 - ॲड. अश्विनी जाधव, वकील.

घर आणि ऑफिस यांची जबाबदारी फक्त महिलांनीच सांभाळावी असेही नाही. दोघांचा संसार हा दोघांनीच उभा करावयाचा असतो. महिलांमध्ये काही गोष्टी उपजत असतात. त्यापैकी एक आहे ते कुटुंबाला बांधून ठेवणे. ती जबाबदारी महिला यशस्वीपणे पार पाडत आहे.
 - अपूर्वा फसलकर, गृहिणी

बदलत्या काळानुसार पुरुषांमध्येही महिलांच्या बाबतीत सकारात्मक फरक पडला आहे; मात्र तरीही अनेक ठिकाणी महिलांना कमी समजले जाते. तर दुसरीकडे पुरुषांना व्हिलन म्हणून बघण्याची वृत्तीदेखील अनेक महिलांमध्ये असते. या दोन्ही बाजूंच्या वृत्तीत बदल होणे गरजेचे आहे.
 - रश्‍मिता साहू, विद्यार्थिनी.

Web Title: marathi news International Women Day women mumbai