कल्याण रेल्वे स्थानकात नारी शक्तीचा सन्मान

रविंद्र खरात
गुरुवार, 8 मार्च 2018

गर्दीच्या वेळात लोकल आणि मेल थांबतात त्या रेल्वे स्थानकातील फलाट वर महिला डब्ब्या समोर  महिला सुरक्षा बल आणि रेल्वे पोलिसांची नेमणूक करावी अशी मागणी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना सचिव श्याम उबाळे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.

कल्याण : कल्याण रेल्वे स्थानक मधील फलाट एकवरून प्रतिदिन सकाळी 8 वाजून 1 मिनिटाला कल्याण ते सीएसटीएम महिला विशेष लोकल सुटते. आज गुरुवार  जागतिक महिला दिनानिमित्त या लोकल गाडीची सजावट करण्यात आली होती, तर या लोकलमध्ये महिला मोटरमॅन, गार्ड, सुरक्षा बल, टिटिई महिला कर्मचारी वर्गाचा रेल्वे आणि कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला.

जागतिक महिला दिनानिमित्त मध्य रेल्वेने ही आपल्या महिला कर्मचारी वर्गाचा विशेष सन्मान केला. कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट एक वरून प्रतिदिन सकाळी 8 वाजून 1 मिनिटला कल्याण ते सीएसटीएम विशेष महिला विशेष लोकल सूटते. आज जागतिक महिला दिना निमित्त या लोकल चालविण्याचा मान महिला वर्गाला दिला . मोटरमन मुमताज काझी, गार्ड मयुरी कांबळे, रेल्वे सुरक्षा बल इंदू केळकर, उर्मिला शर्मा, टी टी ई शारदा विजय, बलबिर कौर आदींनी जबाबदारी पार पाडली. या महिला कर्मचारी वर्गाचा कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे राजेश घनघाव, श्याम उबाळे, ज्योती बोंद्रे, रमन तरे, बजरंग अग्रवाल, संजय राजगुरू आदींनी सत्कार करत लाडू वाटप करत आनंद व्यक्त केला. तर यावेळी मध्य रेल्वे जनसंपर्क अधिकारी ए के सिंग, कल्याण स्टेशन मास्तर प्रदीपकुमार दास, स्टेशन डायरेक्टर विरेश्वर सिंग आदी मान्यवर उपस्थित होते .

जागतिक महिला दिनानिमित्त आज मध्य रेल्वेच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून आज कल्याण मधून सुटणारी महिला विशेष लोकल चालविण्याचा सन्मान महिला कर्मचारी वर्गाला दिला असून अन्य स्टाफ ही महिला आहेत अशी माहिती मध्य रेल्वे जनसंपर्क अधिकारी ए के सिंग यांनी दिली. 

मागील 27 वर्षापासून कुटुंबातील सदस्यांचा आणि मध्य रेल्वेच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या पाठींबा आणि सहकार्यामुळे मी मध्य रेल्वे मध्ये काम करत असून आज जागतिक महिला दिनानिमित्त कल्याण ते सी एसटी एम महिला विशेष लोकल चालविण्याचा सन्मान दिल्याने आनंद वाटत आहे अशी प्रतिक्रिया कल्याण ते सी एसटी एम महिला विशेष लोकलच्या मोटरमेन मुमताज काझी यांनी सकाळला दिली.

जागतिक महिला दिना निम्मित प्रवासी संघटनेच्या विविध मागण्या ..
- महिला विशेष लोकल फेऱ्यामध्ये वाढ करत प्रति लोकल गाडीत महिला डब्बे वाढवा
- महिला विशेष लोकल आणि अन्य लोकल मधील महिला डब्यात सी सी टीव्ही कॅमेरा लावावेत 
- महिला लोकल डब्यात रेल्वे पोलीस महिला कर्मचारी यांची नेमणूक करावी 

गर्दीच्या वेळात लोकल आणि मेल थांबतात त्या रेल्वे स्थानकातील फलाट वर महिला डब्ब्या समोर  महिला सुरक्षा बल आणि रेल्वे पोलिसांची नेमणूक करावी अशी मागणी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना सचिव श्याम उबाळे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.

Web Title: Marathi news Kalyan news women kalyan railway station