40 हजारांसाठी शाळकरी मुलगा वेठबिगार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 नोव्हेंबर 2017

खोपोली : व्यवसायासाठी घेतलेले पैसे परत न दिल्याने दोघा भावांनी एका शाळकरी मुलाचे अपहरण करून त्याला वीटभट्टीवर राबवल्याची माणुसकीला काळिमा फासणारी घटना खालापूर तालुक्‍यात घडली. या प्रकरणी कर्नाटक पोलिसांनी खोपोली पोलिसांच्या मदतीने आंजरून येथून दोन्ही भावांच्या मुसक्‍या आवळल्या आहेत. अपहृत मुलाची सुटका झाल्याने पोलिसांचे आभार मानताना त्याच्या आई-वडिलांना अश्रू आवरले नाहीत.

कर्नाटकमधील निंबर्गा गावातील काशिनाथ नरसाप्पा याने गावातील कच्च्या विटांचे कंत्राटदार धनराज कांबळे व सीताराम कांबळे या भावांकडून एका व्यवहारासाठी काही महिन्यांपूर्वी 40 हजार रुपये घेतले होते. काशिनाथ यांना घरच्या गरिबीमुळे ही रक्कम परत करणे शक्‍य झाले नाही. त्यामुळे संतापलेल्या धनराज आणि सीताराम या भावांनी काशिनाथ यांच्या दहावीत शिकणाऱ्या 16 वर्षीय मुलाचे 12 नोव्हेंबरला रात्री 11 वाजता तो राहत असलेल्या एका सरकारी हॉस्टेलमधून अपहरण केले. त्याला खालापूर तालुक्‍यातील आंजरून येथील एका वीटभट्टीवर वेठबिगारीला जुंपले होते. अपहरणप्रकरणी काशिनाथ यांनी निंबर्गा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिस निरीक्षक राजकुमार माडयालकर, शरणा बसाप्पा यांनी खोपोलीतील पोलिस निरीक्षक राजन जगताप यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिस कर्मचारी रोहन भोईर, शिपाई साहेबराव कदम, दिलीप सोनावणे यांनी तपास करून आंजरून येथे मुलगा असल्याची खात्री केली. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून कांबळे बंधूंना अटक केली. अपहृत शाळकरी मुलाला त्याच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आले आहे. 
 
Web Title: Marathi News Khopoli news bounded labour child labour