कोरेगाव भीमा प्रकरण हे सरकारचे अपयश : काँग्रेस

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 जानेवारी 2018

मुंबई : कोरेगाव भीमा प्रकरणात जे काही घडले ते सरकारचे अपयश असून, मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. 

मुंबई : कोरेगाव भीमा प्रकरणात जे काही घडले ते सरकारचे अपयश असून, मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. 

आज टिळक भवन दादर येथे काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना चव्हाण यांनी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, की कोरेगाव भीमा प्रकरण हे सरकारचे अपयश आहे अशीच सर्वांची भावना आहे. गेल्या तीन वर्षांपासून राज्यात जातीय तणाव निर्माण झाला आहे. सरकार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. जातीय तणाव निर्माण करणाऱ्यांवर सरकार कारवाई का करीत नाही? त्यांना अटक का केली जात नाही? सरकारच्या मूकसंमतीने जाणीवपूर्वक हे सुरू आहे, असा आरोप करून मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. दरम्यान, काँग्रेस पक्ष राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये शिबिरे घेणार असून, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीच्या काही सभा महाराष्ट्रात झाल्या पाहीजेत अशी नेत्यांची इच्छा आहे. यासंदर्भात प्रदेश काँग्रेस राहुल गांधींना महाराष्ट्रात सभा घेण्याची विनंती करणार आहे अशी माहिती चव्हाण यांनी दिली. 

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: marathi news Koregaon Bhima riots Pune Riots Devendra Fadnavis ashok Chavan