ठाणे जिल्ह्यात प्रथमच सचिव दर्जाचे तीन अधिकारी ; पी. वेलरासू यांना सचिवपदी बढती 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जानेवारी 2018

सध्याच्या कार्यरत अधिकाऱ्यांपैकी केवळ संजीव जयस्वाल व पी. वेलरासू यांची थेट आयएएस अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. तर उर्वरित अधिकारी महाराष्ट्र राज्य सेवेतून निवड झालेले आहेत. ठाणे वगळता अन्य महापालिकांमध्ये नेहमीच सहसचिव वा उपसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

ठाणे : कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त पी. वेलरासू यांना सचिवपदावर बढती मिळाल्यामुळे ठाणे जिल्ह्यात प्रथमच सचिव दर्जाचे तीन अधिकारी कार्यरत आहेत. विशेषतः कल्याण महापालिकेतील आयुक्तपदाचा दर्जा हा उपसचिव पदावरून तात्पुरता सचिव म्हणून करण्यात आला आहे. 

ठाणे जिल्ह्यात कोकण विभागीय आयुक्त व ठाणे महापालिका आयुक्तांचे पद सचिवपदाच्या दर्जाचे आहे. या पदावर नेहमीच वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली; मात्र जिल्हाधिकारी व ठाणे वगळता नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, मिरा-भाईंदर महापालिकेत राज्य सरकारने सोईनुसार आयएएस वा राज्य सेवेतून बढती मिळालेल्या आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. 

सध्या ठाणे जिल्ह्यात ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल (1996 बॅच), कोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील (1998 बॅच), कल्याण महापालिकेचे आयुक्त पी. वेलरासू (2002 बॅच), उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त राजेंद्र निंबाळकर व जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर (2007 बॅच), भिवंडी महापालिकेचे आयुक्त योगेश म्हसे (2008 बॅच), मिरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त डॉ. नरेश गिते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार (2009 बॅच) आदी आयएएस अधिकारी कार्यरत आहेत. 

सध्याच्या कार्यरत अधिकाऱ्यांपैकी केवळ संजीव जयस्वाल व पी. वेलरासू यांची थेट आयएएस अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. तर उर्वरित अधिकारी महाराष्ट्र राज्य सेवेतून निवड झालेले आहेत. ठाणे वगळता अन्य महापालिकांमध्ये नेहमीच सहसचिव वा उपसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

या पदावर नियुक्त केलेले सहसचिव पी. वेलरासू यांना 1 जानेवारीपासून सचिव पदावर बढती देण्यात आली आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या इतिहासात प्रथमच सचिवपदाच्या दर्जाचा अधिकारी मिळाला आहे; मात्र या पदावरून लवकरच वेलरासू यांची बदली होण्याची दाट शक्‍यता आहे. 
 

Web Title: marathi news local news mumbai news thane district secretary posting