मुंबई, ठाणे, रायगड, नाशिकमध्ये लष्कर भरती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

ही नाव नोंदणी प्रक्रिया साधारणपणे 1 किंवा 2 सप्टेंबर 2017 पासून सुरू होणार असून 16 ऑक्टोबर 2017 पर्यंत चालू राहणार आहे.

मुंबई : राष्ट्राच्या सेवेमध्ये आदराने आणि शौर्याने सहभागी होण्यासाठी युवकांना लष्कर भरतीची संधी मिळत आहे. यासाठी 1 ते 11 नोव्हेंबर 2017 या कालावधीत सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन केले आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, नाशिक, रायगड आणि पालघर जिल्ह्यातल्या इच्छूक उमेदवारांसाठी अब्दुल कलाम आझाद क्रीडा मैदान, मुंब्रा, जि. ठाणे येथे सैन्य भरती मेळावा होणार आहे.

लष्कराचा पुणे विभाग, महाराष्ट्राचे व्यवस्थापकीय मुख्यालय क्षेत्र आणि गोवा तसेच गुजरात उपविभाग यांच्यासाठी ही भरती केली जाणार आहे. लष्करामध्ये भरती होऊ इच्छिणाऱ्यांनी ऑनलाईन नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. ही नाव नोंदणी प्रक्रिया साधारणपणे 1 किंवा 2 सप्टेंबर 2017 पासून सुरू होणार असून 16 ऑक्टोबर 2017 पर्यंत चालू राहणार आहे. सैन्य भरती मेळाव्याची प्रक्रिया सुलभतेने पार पडावी यासाठी आधी ऑनलाईन नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर 17 ऑक्टोबर 2017 पासून भरती मेळाव्यासाठी प्रवेशपत्र उमेदवारांना देण्यात येतील. ऑनलाईन अर्जावर नमूद केलेल्या ई-मेल पत्त्यावर प्रवेशपत्र उमेदवारांना पाठवली जातील. प्रवेशपत्र डाऊनलोड करून भरती मेळाव्याला उपस्थित राहताना घेऊन येणे आवश्यक आहे.

इच्छूक उमेदवारांनी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करावी. सैन्य भरतीची प्रक्रिया संपूर्णपणे पारदर्शक आहे. या मेळाव्याचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. तसेच सैन्यभरती पूर्णपणे मोफत आहे. मेळाव्याच्या कालावधीत दरदिवशी अंदाजे पाच ते सहा हजार उमेदवार उपस्थित राहतात. त्यामुळे होणारा गोंधळ आणि गैरसोय टाळण्यासाठी नियोजित कालावधीत ऑनलाईन अर्ज भरावेत असे आवाहन संबंधित विभागाने केले आहे.

 

Web Title: marathi news maharashtra indian army recruitment