कल्याणमध्ये विहारातील गौतम बुद्धांच्या मूर्तीची चोरी 

रविंद्र खरात
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

कल्याण : कल्याणच्या पूर्व भागातील लोकग्राम रेल्वे पादचारी पुलाजवळ असलेल्या तथागत बुद्ध विहारातील भगवान बुद्धांची पितळी मूर्ती चोरीला गेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या चोरीच्या घटनेचा सर्वच स्तरांतून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. येत्या 1 नोव्हेंबरपर्यंत चोरीचा छडा न लावल्यास आंदोलन करण्याचा इशारा आंबेडकरी संघटनांनी दिला आहे. 

कल्याण पूर्वमध्ये लोकग्राम रेल्वे पादचारी पुलाजवळ तथागत बुद्धविहार आहे. अनेक वर्षांपासून तेथे बौद्ध पूजापाठ आणि विविध धम्म कार्यक्रम आयोजित केले जात असतात. बौद्ध बांधवांच्या आदराचे आणि श्रद्धेचे स्थान असलेल्या या बौद्ध विहारातील तथागत गौतम बुद्धांची पितळी मूर्ती चोरीस गेल्याची घटना आज (शुक्रवार) सकाळी लक्षात आली. त्यानंतर तातडीने पोलिसांना कळविण्यात आले. 

या घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. येथे काही काळ तणावाचे वातावरण होते. श्‍वान पथकासही पाचारण करण्यात आले होते. कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनीही घटनास्थळी धाव घेतली आणि चोराचा त्वरित शोध लावण्याची मागणी केली. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान, चोरीच्या घटनेची माहिती कळताच विविध संस्था आणि संघटनांच्या प्रतिनिधींनी विहारास भेट देत या घटनेचा तीव्र निषेध केला. 'या चोरीचा युद्धपातळीवर तपास करून 1 नोव्हेंबरपर्यंत चोरीस गेलेली मूर्ती पोलिसांनी ताब्यात घ्यावी आणि दोषींवर कडक कारवाई करावी; अन्यथा आंदोलन करू', असा इशारा माजी नगरसेवक उदय रसाळ यांनी दिला.

Web Title: marathi news marathi websites Kalyan News Crime News Mumbai News