उजव्या बाजूला हृदय; पण आजार कळत नाही..!

हर्षदा परब
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

मुंबई : मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे केईएम रुग्णालयाची अवस्था बिकट झाली होती. त्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे अधिकच हाल झाले. उजव्या बाजूला हृदय असलेल्या पाच वर्षीय सुमितचे ओठ, जीभ व बोटे काळीनिळी पडल्याने त्याच्या आईवडिलांनी उपचारासाठी मंगळवारी अकोल्याहून थेट मुंबई गाठली. पण डॉक्‍टरांनी सांगितलेल्या तपासणीसाठी येणारा खर्च ऐकून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यातच मंगळवारी झालेल्या पावसामुळे त्यांना रस्त्यावरच रात्र काढावी लागल्याने त्यांचे अधिकच हाल झाले. 

सुमितचे हृदय उजव्या बाजूला असल्याचे चार वर्षांपूर्वी त्याच्या आईवडिलांना कळले. पण निळे पडणारे शरीर व श्‍वास घ्यायला कशामुळे त्रास होत आहे, हे मात्र त्यांना कळले नाही. मालेगावमध्ये राहणाऱ्या शंकर पांढरे यांनी मुलगा सुमितला स्थानिक डॉक्‍टरांकडे नेले. त्यांनी त्याला केईएममध्ये नेण्याचा सल्ला दिला. डॉक्‍टरांनी ऑगस्टमध्ये सुमितला तपासणीसाठी बोलावले होते.

सुताराकडे 200 ते 250 रुपये रोजंदारीवर काम करणाऱ्या शंकर पांढरे यांनी पैशाची जुळवाजुळव करून त्याला मंगळवारी (ता. 29) मुंबईत आणले. 10 तासांच्या प्रवासानंतर मंगळवारी मुंबईत आलेल्या पांढरे कुटुंबीयांनी आयुष्यात पहिल्यांदा एवढा पाऊस पाहिल्याचे सुमितची आई बबिता हिने सांगितले. रुग्णालयाच्या आवारातच आसऱ्याला असलेल्या पांढरे कुटुंबीयांनी सुमितला खांद्यावर घेत रात्र काढली. थंडाव्याने दुपारी सुमितचा दमाही चाळवला होता. औषध देऊन बरे वाटले. सुमित बरा होईल ना, असा केविलवाणा प्रश्न त्याची आई बबिता पांढरे या डोळ्यांत आसवे आणून विचारत होत्या. 

सुमितला नेमके काय झाले हे सोनोग्राफीतही समजलेले नाही. म्हणून डॉक्‍टरांनी नवीन तपासणी करायला सांगितली आहे, असे सुमितच्या वडिलांनी सांगितले. तपासणीसाठी पाच हजारांचा खर्च रुग्णालयाने सांगितला आहे. खिशात मोजकेच पैसे, बुडालेली रोजंदारी यामुळे आता तपासणी कशी करायचा, असा प्रश्‍न त्याच्या आई-वडिलांना पडला आहे. 

सुमितला उपचारांसाठी मदत हवी आहे. 
सुमितच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत हवी आहे. राजीव गांधी जीवनदायी योजनेची नोंदणी असलेला एक कागद त्यांना तहसील कार्यलयातून मिळाला आहे. पण त्याव्यतिरिक्तचा खर्च कसा होईल याची चिंता पांढरे कुटुंबीयांना लागून राहिली आहे. सुमितच्या कुटुंबीयांकडे बॅंकेचे खाते नाही. 

सुमितच्या आई बबिता पांढरे यांचा मोबाईल नंबर : ९११२-९०९-२४५

Web Title: marathi news marathi websites Mumbai news Harshada Parab