डोंबिवलीत शौचालयासाठी महिला टमरेलसह रस्त्यावर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जानेवारी 2018

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेकडील इंदिरानगर झोपडपट्टीतील शौचालयाच्या दुरवस्थेकडे पालिका प्रशासन तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत बुधवारी (ता. 10) येथील महिला टमरेलसह रस्त्यावर उतरल्या. संतप्त महिलांनी रास्ता रोकोचा प्रयत्न करताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. 

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेकडील इंदिरानगर झोपडपट्टीतील शौचालयाच्या दुरवस्थेकडे पालिका प्रशासन तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत बुधवारी (ता. 10) येथील महिला टमरेलसह रस्त्यावर उतरल्या. संतप्त महिलांनी रास्ता रोकोचा प्रयत्न करताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. 

शहरातील इंदिरानगर झोपडपट्टीतील सार्वजनिक शौचालयाचे दरवाजे तुटल्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मलनिःसारण प्रक्रियेचेही तीनतेरा वाजले असून, शौचालयातील सांडपाणी आणि टाकीतील मलमूत्र आजूबाजूच्या परिसरात पसरत असल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही स्थानिक लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याचे सांगत अखेर महिलांनी रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला. 

बुधवारी साडेबाराच्या सुमारास महिला टमरेल घेऊन रस्त्यावर जमा झाल्या. त्यांनी स्थानिक नगरसेविका दर्शना शेलार यांच्या जनसंपर्क कार्यालयात जाऊन या प्रश्‍नी जाब विचारला; मात्र या वेळी त्या नसल्याने त्यांचे वडील तथा माजी नगरसेवक सदाशिव शेलार यांनी पालिका प्रशासन याला जबाबदार असून, संबंधित ठेकेदार शौचालयाची योग्य निगा राखत नसल्याचा आरोप केला. तब्बल तीन तास हा गोंधळ सुरू होता. शौचालय दुरुस्त झाले नाही तरी आम्हाला रस्त्यावर प्रातर्विधी करण्याची परवानगी द्या, अशी मागणी या वेळी संतप्त महिलांनी केली. 

टॉयलेटला जीएसटीचा फटका? 
शौचालयाचा ठेकेदार देखभाल व्यवस्थित करत नाही; मात्र जीएसटी लागू करून बिलाची रक्कम अदा केली जाणार नाही, अशी भूमिका पालिकेने घेतल्याने ठेकेदाराचेही काम अडले आहे. ठेकेदाराची समस्याही पालिकेकडे मांडण्यात आली असून, वेळकाढूपणा केला जात आहे, असे माजी नगरसेवक सदाशिव शेलार यांनी केला आहे. त्यामुळे जीएसटीच्या कामाचा फटका स्थानिक मूलभूत सोई-सुविधांवरही पडत असल्याचे समोर आले आहे. 

मोदी सरकार एकीकडे गावोगावी शौचालय बांधण्यासाठी जाहिराती करत आहे; मात्र शहरांमध्ये अशी अवस्था असल्याने गरिबांनी काय करायचे? 
- सुजरा भालेराव, रहिवासी

Web Title: marathi news marathi websites Mumbai News swachh bharat