“सॅटीस ईस्ट”साठी ठाण्यात स्कायवॉकचा बळी

दीपक शेलार
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

ठाणे : ठाणे महापालिकेद्वारे ठाणे पुर्व भागात सॅटीसच्या धर्तीवर “सॅटीस ईस्ट” हा नवा पूल उभारण्यात येणार आहे.मात्र,या “सॅटीस ईस्ट” प्रकल्पासाठी पूर्वेकडील स्थानक परिसरातील उभारण्यात आलेल्या स्कायवॉकचा बळी जाणार आहे.अष्टविनायक चौकाच्या बाजूने हा स्कॉयवॉक कापावा लागणार आहे.तर,दुसऱ्या बाजूने स्कायवॉक नव्या सॅटीसला जोडण्याचा पालिकेचा मानस आहे.त्यामुळे,अनंत अडथळ्यांची शर्यत पार करून उभारलेल्या या निरुपयोगी स्कायवॉकसाठी खर्ची पडलेले कोट्यवधी रुपये नाहक पाण्यात जाणार आहेत.तेव्हा,भविष्यात एखादा प्रकल्प उभारताना नागरिकांच्या सूचनादेखील प्रशासनाने विचारात घ्याव्यात.असा घरचा आहेर महापौर मिनाक्षी शिंदे य

ठाणे : ठाणे महापालिकेद्वारे ठाणे पुर्व भागात सॅटीसच्या धर्तीवर “सॅटीस ईस्ट” हा नवा पूल उभारण्यात येणार आहे.मात्र,या “सॅटीस ईस्ट” प्रकल्पासाठी पूर्वेकडील स्थानक परिसरातील उभारण्यात आलेल्या स्कायवॉकचा बळी जाणार आहे.अष्टविनायक चौकाच्या बाजूने हा स्कॉयवॉक कापावा लागणार आहे.तर,दुसऱ्या बाजूने स्कायवॉक नव्या सॅटीसला जोडण्याचा पालिकेचा मानस आहे.त्यामुळे,अनंत अडथळ्यांची शर्यत पार करून उभारलेल्या या निरुपयोगी स्कायवॉकसाठी खर्ची पडलेले कोट्यवधी रुपये नाहक पाण्यात जाणार आहेत.तेव्हा,भविष्यात एखादा प्रकल्प उभारताना नागरिकांच्या सूचनादेखील प्रशासनाने विचारात घ्याव्यात.असा घरचा आहेर महापौर मिनाक्षी शिंदे यांनी दिला आहे.

ठाणे पूर्व रेल्वे स्थानक परिसरातून मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करतात. या भागातील रस्ते अरुंद असल्यामुळे त्याठिकाणी सातत्याने वाहतूक कोंडी होत असते. यामुळे प्रवाशांना चालण्यासाठी पुरेसा मार्ग शिल्लक नसतो.

यासाठी ठाणे पूर्व स्थानक परिसरात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून 2007 साली अवाढव्य स्कायवॉक उभारण्यात आला. या स्कायवॉकची मार्गिका अष्टविनायक चौकाच्या दिशेने करण्यात येणार होती. मात्र,स्थानकांतील प्रवाशी या दिशेने फारसे वाहतूक करीत नसून ही मार्गिका सिद्धार्थनगरच्या दिशेने करावी,अशी मागणी करत स्थानिकांनी प्रकल्पास विरोध केला होता. या विरोधामुळे गेले अनेक वर्षे या प्रकल्पाचे काम रखडले होते. अखेर स्थानिकांच्या विरोधाची शर्यत पार करत स्कायवॉक उभारणी झाली.

या स्कायवॉकचा प्रवासी मोठ्या प्रमाणात वापर करतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. प्रत्यक्षात मात्र ती अपेक्षा फोल ठरून दिवस-रात्र येथे गर्दुल्ले आणि प्रेमी युगुलांचा वावर असतो. निर्मनुष्य ठिकाण बनल्याने इथे गुन्हेगारी प्रवृत्तीचा वावरदेखील वाढला आहे. अनेकदा वारांगनादेखील स्कायवॉकवरच बस्तान ठोकत असल्याने सहसा महिला प्रवाशी येथून जाण्यास कचरतात.

भिकारी,बेघरांनी स्कायवॉकवरच संसार थाटल्याने केरकचरा आणि घाणीचे साम्राज्य पसरलेले असते. असे असतानाच कोट्यावधी रुपये खर्चून उभारलेल्या स्कायवॉक आता ठाणे पूर्व स्थानक सॅटीस प्रकल्पात बाधीत होणार आहे. मंगला हायस्कूलजवळून सॅटीसची मार्गिका जाणार असल्यामुळे या भागातील स्कायवॉक तोडावा लागणार आहे.त्यामुळे या प्रकल्पावर खर्च करण्यात आलेले पैसे पाण्यात जाणार आहेत.
 

महापालिकेच्या महात्वाकांक्षी “सॅटीस ईस्ट” प्रकल्पासाठी या स्कायवॉकची 70 मीटरची मार्गिका बाधीत होणार आहे.त्यासाठी मंगला हायस्कूलकडे जाणाऱ्या स्कायवॉकचे फौंडेशनदेखील काढावे लागणार असून ही मार्गिका दुसऱ्या ठिकाणी  बसविता येऊ शकते.त्यामुळे या मार्गिकेवर करण्यात आलेला खर्च वाया जाणार नाही.
- प्रविण पापळकर, कार्यकारी अभियंता, ठामपा

कोपरीतील हा स्कायवॉक तसा निरुपयोगीच ठरला असून येथून कुणीही ये-जा करीत नाही ही वस्तुस्थिती आहे.लोकप्रतिनिधीना तांत्रिक बाबी कळत नसतीलही परंतु,एखादा प्रकल्प उभारताना प्रशासनाने नागरिकांच्या सूचनांचा विचार करणे क्रमप्राप्त आहे.तेव्हा,भविष्यात तरी प्रशासनाने अशा चुका टाळाव्यात.
मिनाक्षी शिंदे, महापौर, ठाणे

Web Title: marathi news marathi websites Thane News Mumbai News Thane Skywalk