आतापासूनच मोखाड्याला पाणी टंचाईच्या झळा

भगवान खैरनार
शनिवार, 10 मार्च 2018

मोखाडा : पालघर जिल्हयातील सर्वात अतिदुर्गम आणि शेवटचे टोक असलेल्या मोखाडा तालुक्यात फेब्रुवारीच्या अखेरीस पाणी टंचाई ला सुरूवात झाली आहे. तालुक्यातील  14 गाव-पाडयांनी टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी शासनाकडे केली होती. त्यानुसार शासनाने मार्चच्या पहिल्या आठवड्यात 4 गावे आणि 5 पाड्यांना 4 टॅंकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला आहे. मात्र, उर्वरीत 5 गाव-पाडे पाण्यापासुन वंचित असुन, येथील आदिवासींना रणरणत्या उन्हात पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. 

मोखाडा : पालघर जिल्हयातील सर्वात अतिदुर्गम आणि शेवटचे टोक असलेल्या मोखाडा तालुक्यात फेब्रुवारीच्या अखेरीस पाणी टंचाई ला सुरूवात झाली आहे. तालुक्यातील  14 गाव-पाडयांनी टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी शासनाकडे केली होती. त्यानुसार शासनाने मार्चच्या पहिल्या आठवड्यात 4 गावे आणि 5 पाड्यांना 4 टॅंकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला आहे. मात्र, उर्वरीत 5 गाव-पाडे पाण्यापासुन वंचित असुन, येथील आदिवासींना रणरणत्या उन्हात पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. 

"नेमेची येतो पावसाळा" या उक्ती प्रमाणे मोखाड्यात नेहमीच येते पाणी टंचाई असे गणित जुळले आहे. पुर्वी ठाणे आणि आता चार वर्षापासून पालघर जिल्हयात शेवटचे टोक आणि अतिदुर्गम आदिवासी लोकवस्ती असलेल्या मोखाडा तालुक्यात प्रतिवर्षी माहे फेब्रुवारी पासुन पाणी टंचाईला सुरूवात होते. पाणी टंचाईला आळा घालण्यासाठी तालुक्यात, शासनाने अनेक उपाययोजना राबविल्या आहेत. मात्र, केलेल्या खर्चाच्या मोबदल्यात, पाणी टंचाई कमी झालेली नाही. टंचाईग्रस्त गाव-पाडयांना, पाणी पुरवठ्यासाठी टॅंकरद्वारे पाणी पुरवठा हाच प्रभावी इलाज शासनाकडून प्रतिवर्षी केला जातो आहे. त्यासाठी शासनाला कोटीच्या घरात खर्च करावा लागतो आहे.

याही वर्षी फेब्रुवारी च्या अखेरीस तालुक्यातील स्वामीनगर, शास्रीनगर, धामणी, ब्राह्मणगाव, या गावांसह आसे ग्रामपंचायत हद्दीतील दापटी क्र. 1 व 2, कुंडाचापाडा, धामोडी, आणि गोळीचापाडा यांसह 14 गाव-पाडयांनी टॅंकरद्वारे पाणी पुरवण्याची मागणी शासनाकडे केली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे या गाव पाड्यांचे प्रस्ताव पाठविल्यानंतर मार्चच्या पहिल्या आठवड्यात 4 गावे आणि 5 पाड्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी 4 टॅंकरना मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, उर्वरीत 5 गाव-पाडे आजही पाण्यापासुन वंचित आहेत. येथील आदिवासींना रणरणत्या उन्हात पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. 

शासनाच्या धोरणानूसार टंचाई ग्रस्त गाव-पाडयांनी टॅंकर द्वारे पाणी पुरवठ्याची मागणी केल्यास, तेथील टंचाईची तातडीने  24  तासात तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी संयुक्तपणे पाहणी करून त्यांना पाणी ऊपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तसेच दिड किलोमीटर अंतरा पर्यंत कुठेही पाणी साठा उपलब्ध नसल्याची खात्री करून त्यांना पाणी पुरवठा करण्याची, जाचक अट शासनाने घातली आहे.

प्रतिवर्षी तेच गाव पाडे टंचाईग्रस्त आराखडय़ात समाविष्ट असल्याने, टंचाईला आळा घालण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचे झाले तरी काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. गतसाली 28 गावे आणि 60 पाडे असे एकूण 88 टंचाईग्रस्त गाव-पाडयांचा आराखडा तयार करण्यात आला होता. तर याही वर्षी तेव्हढ्याच गाव पाड्यांचा आराखडा शासनाला सादर केला गेला आहे. त्यामुळे ऊपाययोजना सपशेल अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. 

दरम्यान, उन्हाची तीव्रता दिवसागणिक वाढत आहे. तसतशी विहीरींच्या पाण्याची पातळी खालावत जाऊन विहीरी कोरड्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे टंचाई ग्रस्त गाव-पाडयांची संख्या ही वाढत आहे. यावर्षी उन्हाची तीव्रता अधिक जाणवत असल्याने गतसालापेक्षा टंचाई ग्रस्त गाव-पाडयांची संख्या वाढण्याची शक्यता पाणीपुरवठा विभागाने वर्तविली आहे. 

Web Title: Marathi news mokhada news lack of water